कारंजाचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर केंद्र रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:46 PM2017-09-25T22:46:58+5:302017-09-25T22:47:26+5:30
येथील ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर केंद्रातील कामकाज सध्या वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे रामभरोसेच सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : येथील ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर केंद्रातील कामकाज सध्या वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे रामभरोसेच सुरू आहे. येथे वैद्यकीय अधिकाºयांची नऊ पदे मंजूर असून केवळ दोन वैद्यकीय अधिकाºयांच्या भरवश्यावर नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली जात आहे. कामकाज करताना कार्यरत दोन्ही वैद्यकीय अधिकाºयांना तारेवरची कसरतच करावी लागत असल्याने रिक्त पदे तात्काळ भरण्याची गरज आहे.
परिसरातील प्रत्येक घरी ताप, सर्दी, खोकला आदी विविध आजारांची लागण झालेले रुग्ण असल्याचे दिसून येते. विविध आजारांनी सध्या या परिसरात थैमानच घातले आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचेही आजार बळावत आहेत. दररोज या रुग्णालयात सुमारे ४०० रुग्ण येत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आरोग्य सेवा घेण्यासाठी येत येत असताना रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळावे या हेतूने येथे ट्रामा केअर केंद्र तयार करण्यात आले आहे. परंतु, मोठ्या प्रमाणात येणाºया रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवितांना वैद्यकीय सचिन खोंड व अधीक्षक डॉ. प्रभाकर वंजारी यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. आठवड्याची सुटी न घेता ते बहुदा सलग चार-चार दिवस कर्तव्य बजावतात. दोन वैद्यकीय अधिकाºयांवर येणारा कामाचा वाढता तान लक्षात घेता सदर रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे, अशी मागणी नागरिकांची आहे.
कारंजा ग्रामीण रुग्णालयासाठी तीन वैद्यकीय अधिकारी व एक अधीक्षक तसेच ट्रामा केअर युनीटसाठी दोन वैद्यकीय अधिकारी, दोन भुलतज्ञ, एक अस्थिभंग तज्ञ आणि एक जनरल फीजीशीयन अशी एकूण नऊ पदे मंजूर आहेत. परंतु, सद्या स्थितीत ट्रामा केअर युनीटला एकही डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. येथील दोन्ही रुग्णालये मिळून चक्क सात वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. १५ वर्षापूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयाला लागून असलेले ट्रामा केअर युनीट सुरू करण्यात आले आहे. यासाठी करोडो रुपयांचा निधीही खर्च करण्यात आला आहे. लाखोंच्या मशीनरी आणल्यात. पण, तज्ज्ञच उपलब्ध नाही. परिणामी, मशीनरी धुळ खात पडल्या आहेत. एक्सरे टेक्नीशीयन आहे; पण त्याला काम नाही. ११ परिचारीका, चार स्वच्छता कर्मचारी असले तरी स्वच्छतेचा वानवा आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता सदर प्रकरणी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
देयक न दिल्याने इमारतीचे बांधकाम अपूर्णच
ग्रामीण रुग्णालयांची जुनी इमारा शिकस्त झाल्यामुळे ३ कोटी ७० लाख रूपये खर्च करून नवीन इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कंत्राटदाराला बांधकामाची देयके प्राप्त झाली नसल्याने काम अपूर्ण आहे. बांधकामाची मुदत संपली आहे. बांधकाम पूर्ण होवून ग्रामीण रुग्णालय नवीन इमारतीमध्ये केव्हा जाणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. एकदंरीत ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर केंद्राच्या सध्याच्या कामाकाजाकडे संबंधीत वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्षच होत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांमध्ये आहे.
अनेक दिवसांपासून शासनाकडून नवीन वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली नाही. आम्ही दोघे सलग दोन-दोन दिवस ड्युटी करून नागरिकांना आरोग्य सेवा पुरवितो. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे.
- डॉ. प्रभाकर वंजारी, अधीक्षक, ग्रा.रु. कारंजा (घा.)