‘एम्स’च्या सदस्यपदी रामदास तडस यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:30 PM2019-07-13T12:30:31+5:302019-07-13T12:31:13+5:30
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर या राष्ट्रीयस्तरावरील महत्त्वाच्या संस्थेवर खासदार रामदास तडस यांची लोकसभेतून अविरोध निवड करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर या राष्ट्रीयस्तरावरील महत्त्वाच्या संस्थेवर खासदार रामदास तडस यांची लोकसभेतून अविरोध निवड करण्यात आली. याबाबत लोकसभा सचिवालयाने लोकसभेत संपन्न झालेल्या निवडणूक निकालाची अधिकृत घोषणा केली. यासोबतच संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या सदस्यपदावर खासदार रामदास तडस यांची अविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्यात पहिले अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर येथे स्थापन करण्यात आले आहे. या संस्थेवर महाराष्ट्र राज्यातील लोकसभेतील ४८ खासदारांपैकी दोन खासदारांची सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. यात खासदार रामदास तडस यांच्यासह कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा लोकसभा सचिवालयाने गुरुवारी ११ जुलै २०१९ रोजी नवी दिल्ली येथे केली.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर तसेच संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल खासदार तडस यांनी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा, सभापती ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.