रामनाम जयघोषाने दुमदुमणार घोराड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 09:02 PM2018-03-24T21:02:25+5:302018-03-24T21:02:25+5:30
विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र घोराड येथे श्रीराम नवमी यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली आहे. येथील यात्रा महोत्सवाला पावणे दोनशे वर्षांची परंपरा आहे. रामनामाच्या जयघोषाने प्रतिपंढरपूर दुमदुमणार आहे.
आॅनलाईन लोकमत
घोराड : विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र घोराड येथे श्रीराम नवमी यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली आहे. येथील यात्रा महोत्सवाला पावणे दोनशे वर्षांची परंपरा आहे. रामनामाच्या जयघोषाने प्रतिपंढरपूर दुमदुमणार आहे.
संत केजाजी महाराज व त्यांचे पुत्र संत नामदेव महाराज यांनी सुरू केलेल्या धार्मिक प्रथा, परंपरा आजही जोपासल्या जात आहे. गुढी पाडवापासून चैत्र नवरात्राला प्रारंभ होतो. याच दिवसापासून तर द्वादशीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. २५ मार्च रविवारी दुपारी १२ वाजता गुलालाची उधळण, हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदुंगाचा निनाद करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. यावेळी श्रीराम जन्मोत्सवावर डॉ. आवारी महाराज यांचे कीर्तनही आयोजित करण्यात आलेले आहे. याच रात्री १० वाजता भजनी दिंड्यांसह रथ मिरवणूक गावातील पालखी मार्गाने निघणार आहे. या रथावर हनुमंताची मूर्ती विराजमान राहणार आहे.
परंपरेनुसार रथावर दोन मशालधारी राहत असून हा मान नक्षीणे परिवाराला आहे. विलास नक्षीणे व प्रदीप नक्षीणे हे रथावर मशाल घेऊन राहतात. हा रथ लाकडी असून भाविकांच्या साह्याने ओढला जातो. या महोत्सवाला दूरवरून भाविक येत असल्याने घोराड येथे भाविकांची पाच दिवस गर्दी उसळणार आहे. मंदिरावर करण्यात आलेला विद्युत रोषणाईचा झगमगाट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
संत केजाजी व संत नामदेव महाराज यांच्याप्रती श्रद्धा असणारे विदर्भातील असंख्य भाविक श्रीराम नवमी उत्सवानिमित्त घोराड गावात दाखल होत आहेत. या भाविकांच्या स्वागतासाठी घोराड नगरी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. येथील विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची मोठी उपस्थिती असते. राम जन्मोत्सवातही भाविकांचा मळाच येथे फुलणार असल्याचे दिसते.
विविध धार्मिक कार्यक्रम
२५ मार्च रविवारी सकाळी १० ते दुपारी १२ रामजन्मोत्सवानिमित्त कीर्तन, सोमवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत डॉ. आवारी महाराज यांचे काल्याचे कीर्तन, सायंकाळी ५ वाजता गो-माता मंदिरावर दहीहांडी कार्यक्रम, २७ रोजी एकादशी निमित्त भजन, जागर, २८ रोजी पारंपरिक फुगड्यांचा कार्यक्रम होणार आहे.