कराराच्या मागणीसाठी रापमचे कामगार संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 10:25 PM2018-06-08T22:25:00+5:302018-06-08T22:25:00+5:30
रा.प.म.च्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात मोठ्या संख्येने वाहक व चालक सहभागी झाल्याने रापमच्यावतीने देण्यात येणारी प्रवासी वाहतूक सेवा शुक्रवारी सकाळी खोळंबली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रा.प.म.च्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात मोठ्या संख्येने वाहक व चालक सहभागी झाल्याने रापमच्यावतीने देण्यात येणारी प्रवासी वाहतूक सेवा शुक्रवारी सकाळी खोळंबली होती. या संपात सर्वच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले नसले तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे रापमच्या वर्धा विभागातील पाचही आगारातून अनेक बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. परिणामी, रापमला लाखांचा आर्थिक फटकाच बसला.
रापमच्या वर्धा विभागाच्या अंतर्गत पाच आगार आहेत. या पाचही आगारातून दररोज ३५९ बस फेºयांचे नियोजन केले जाते. रापमच्या कामगारांनी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्याने शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ७६ बस फेऱ्या रद्द झाल्या होत्या. जसजसा सूर्य मावळतीला गेला तसतशा बस फेऱ्याही रद्द होण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे रापमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रापमच्या वाहक, चालक व कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप जाहीर होताच मध्यरात्री वर्धा आगारात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
या आगारात एकूण ७९ बसेस असून त्यापैकी रात्रपाळीला ३० बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर १४ बसेस परतीच्या प्रवासासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. सदर बेमुदत संपात कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह संपूर्ण कार्यकर्ते तसेच एमएमकेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. संपात सहभागी रापमच्या वाहक, चालक व कर्मचाºयांनी वर्धा आगारासमोर दिवसभर ठिय्या देत सरकार विरोधी निदर्शने केली.
अन् पोलीस बंदोबस्तात आगारातून बाहेर पडल्या बसेस
फेºयांचे नियोजन केल्यानंतर जे रापमचे चालक व वाहक संपात सहभागी नाही त्यांच्याकडून आगारात उभी असलेली बस बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी संपात सहभागी वाहक, चालक व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना आगाराच्या मुख्य द्वारावर अडविल्याने काही काळाकरिता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या शांततापूर्ण तणावाच्या वातावरणात अखेर पोलिसांनी मध्यस्ती करून आगारात उभ्या असलेल्या बसेस आगाराबाहेर काढल्या.
कामगारांसह कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ७६ बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत. अल्प मनुष्यबळामुळे बस फेऱ्या रद्द झाल्याने रापमच्या वर्धा विभागाचे मोठ्या प्रामाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान लाखोंच्या घरात आहे.
- चेतन हासबनीस, विभाग नियंत्रक, रा.प.म. वर्धा.