रामपूर-वाई रस्ता चिखलात हरविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 10:22 PM2019-08-07T22:22:09+5:302019-08-07T22:22:33+5:30
शेतकऱ्यांच्या बांधावर थेट शेतीपयोगी साहित्य व त्यांचा शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्याकरिता बांधापर्यंत वाहने पोहोचावी याकरिता शासनाने पांदण रस्ता योजना राबविली; परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे चांगल्या योजनेची कशी वाट लागली, याचे जिवंत उदाहरण म्हणजे रामपूर ते पिपळधरी रस्ता.
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : शेतकऱ्यांच्या बांधावर थेट शेतीपयोगी साहित्य व त्यांचा शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्याकरिता बांधापर्यंत वाहने पोहोचावी याकरिता शासनाने पांदण रस्ता योजना राबविली; परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे चांगल्या योजनेची कशी वाट लागली, याचे जिवंत उदाहरण म्हणजे रामपूर ते पिपळधरी रस्ता.
ही दोन्ही गावे आदिवासीबहुल आहे. या रस्त्यालगत पिपळधरी, विरुळ, रामपूर येथील शेतकºयांची शेती आहे. हा रस्ता अत्यंत खडतर असल्यामुळे काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे माती टाकून बांधकाम करण्यात आले. काही दिवस हा रस्ता समांतर होऊ दिला; परंतु पाच वर्षांचा काळ लोटूनही संबंधित विभागाला या रस्त्यावर मुरुम टाकायचा मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे या रस्त्यावर केवळ माती असल्याने यंदाच्या पावसाने तब्बल दोन कि. मी. चा रस्ता सर्वत्र चिखलाने माखला. शेतकऱ्यांना मोठी कसरत करून बंडी बाजूला ठेवून डवरणीचे साहित्य डोक्यावर घेऊन चिखल तुडवत शेतात जावे लागते. खत-युरियाच्या थैल्या डोक्यावर न्याव्या लागत असल्याने शेतकऱ्यांच्या आरोग्यावर परीणाम होत आहे. रस्ता खराब असल्यामुळे या भागातील शेतात कुणी मजुरही यायला पाहत नाही. त्यामुळे अनेकांची शेती पडीत राहते. याच रस्त्यावरील नाल्यावर बांधलेला पूलही वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ झाली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करीत त्वरित मुरूम टाकून वहिवाटीसाठी हा रस्ता मोकळा करून देण्याची मागणी होत आहे.