भाजपच्या गोटात अस्वस्थता सभापतिपदावरून रणकंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 06:00 AM2020-01-18T06:00:00+5:302020-01-18T06:00:11+5:30
जिल्हा परिषदेमध्ये भाजपाला बहूमत असल्याने नुकताच पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सरिता गाखरे या अध्यक्ष तर वैशाली येरावार उपाध्यक्ष म्हणून बहुमताने निवडून आल्या. त्यांना भाजपाचे ३१ तसेच मित्रपक्ष असलेल्या आरपीआय (आठवले गट) यांच्या एका तर शिवसेनेच्या दोन सदस्यांची अशी एकूण ३४ मते मिळाली होती. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाच्या सदस्याला केवळ १८ मतांवरच समाधान मानावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर विषय समिती सभापतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विषय समिती सभापतींच्या निवडीच्या तोंडावरच अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील घोडेबाजारामुळे काही सदस्य नाराज असल्याची चर्चा रंगल्याने भाजपच्या गोटात चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच संधीचा फायदा उचलत विरोधकांकडून डाव साधण्याची तयारी चालविली आहे.
जिल्हा परिषदेमध्ये भाजपाला बहूमत असल्याने नुकताच पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सरिता गाखरे या अध्यक्ष तर वैशाली येरावार उपाध्यक्ष म्हणून बहुमताने निवडून आल्या. त्यांना भाजपाचे ३१ तसेच मित्रपक्ष असलेल्या आरपीआय (आठवले गट) यांच्या एका तर शिवसेनेच्या दोन सदस्यांची अशी एकूण ३४ मते मिळाली होती. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाच्या सदस्याला केवळ १८ मतांवरच समाधान मानावे लागले. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी असतानाही जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्यांनी भाजपचा हात धरला. याची वरिष्ठांकडून दखल घेण्यात आल्याची माहिती आहे. यासोबतच अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान घोडेबाजार झाल्याची चर्चा पुढे आल्याने दावेदारांचा हिरमोड झाला आहे. परिणामी, भाजपच्या गटामध्ये सध्या चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. भाजपचेच काही पदाधिकारी व सदस्य विरोधकांच्या सोबतीला असल्याचे बोलेले जात आहे. त्यामुळे भाजपातील गोटातील नाराज सदस्यांशी विरोधक संपर्कात आहे. त्यामुळे भाजपाकडून सर्व सदस्यांना एकत्रित आणण्याकरिता शुक्रवारी सायंकाळी एका हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजनही करण्यात आले तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाकडूनही सायंकाळीच संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. आता शनिवारी निवडणुकीत भाजपातील सदस्य विरोधकांचा हात पकडणार की पक्षाशी एकनिष्ठ राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इच्छुकांच्या गर्दीत कोण होणार सभापती ?
जि.प.त भाजपाचे बहुमत असल्याने सभापतिपदासाठी फिल्डिंग लावली जात आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीदरम्यान विषय समिती सभापती पदाची विभागणी करण्यात आली. यामध्ये हिंगणघाट मतदार संघाला दोन तर वर्धा व देवळी मतदार संघास प्रत्येकी एक सभापतिपद देण्याचे ठरले होते. यासोबत मित्रपक्षाला सभापतिपद द्यायच आहे. त्यामुळे भाजपाकडे ईच्छूकांची गर्दी असल्याने कोणाला संधी द्यावी, हा प्रश्न आहे. हिंगणघाटमध्ये दोन पदांकरिता तीन, वर्धा व देवळीमध्ये एका पदाकरिता प्रत्येकी दोन सदस्य इच्छुक असले तरी निवडीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
शनिवारी होणाऱ्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणेच निवड होणार आहे. यावेळी चार सभापती निवडले जाणार असून सभागृहातच महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण सभापतींची घोषणा होणार आहे. तर उर्वरित बांधकाम व वित्त समिती, आरोग्य व शिक्षण समिती आणि कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतिपद कुणाला द्यायचे याचा निर्णय अध्यक्ष घेतील. यातील एकपद उपाध्यक्षांकडेच राहणार असल्याने दोन पदाकरिता सभापती निवडले जाईल.
असा आहे निवडणूक कार्यक्र म
जि.प.च्या सभागृहात सकाळी ११ ते १.३० या कालावधीत निवडणूक होणार आहे. अध्यासी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे राहतील. सकाळी ११ ते १ वाजता नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येईल. दुपारी १ वाजता अर्जाची छाननी, १.१५ ते १.३० वाजता अर्ज मागे घेण्यात येईल. त्यानंतर १.३० वाजता सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
भाजपचे मताधिक्य घटणार?
अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपाच्या सदस्यांना शिवसेनेच्या दोन सदस्यांनी साथ दिल्याने ३४ मते मिळाली होती. पण, शिवसेनेच्या सदस्यांच्या या कृतीमुळे वरिष्ठांकडून दखल घेण्यात आल्याने आता शिवसेनेचे दोन्ही सदस्य काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाच्या सोबत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जर हे दोन्ही सदस्य महाविकास आघाडीसोबत गेले तर भाजपाचे दोन मते कमी होईल.