तळेगावच्या विश्रामगृहात रंगली निरोप समारंभाची पार्टी; संचारबंदीला फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 05:00 AM2021-05-03T05:00:00+5:302021-05-03T05:00:12+5:30
सार्वजनिक बांधकाम विभाग आष्टी येथील एक अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांना निरोप देण्याकरिता ३० एप्रिलच्या सायंकाळी तळेगाव (श्याम पंत) येथील बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाकरिता कापडी मंडप टाकून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने विवाहासह आदी समारंभावर निर्बंध घालण्यात आले आहे. असे असतानाही स्थानिक विश्रामगृह परिसरात एका सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला निरोप देण्यासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनीच नियमाला तिलांजली दिल्याने नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग आष्टी येथील एक अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांना निरोप देण्याकरिता ३० एप्रिलच्या सायंकाळी तळेगाव (श्याम पंत) येथील बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाकरिता कापडी मंडप टाकून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
पाच व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास मनाई असतानाही या निरोप समारंभाला जवळपास ५० ते ६० व्यक्तींची उपस्थिती असावी, असे तेथे असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवरून दिसून आले. या आपत्तीकाळात सर्वसामान्यांना कार्यक्रम करण्यासाठी कोविड चाचणी, पोलीस परवानगी आदी भानगडी कराव्या लागतात.
त्यानंतरही उपस्थिती आणि वेळेची मर्यादा असतेच. पण, या निरोप समारंभाच्या आयोजनावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांना परवानगी व उपस्थितीचे बंधने नाहीत काय? असा प्रश्न विचारल्या जात आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई होणार काय? याकडे तळेगाववासीयांचे लक्ष लागले आहे.