संतप्त विद्यार्थ्यांनी रोखल्या रापमच्या लालपऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 05:00 AM2021-10-24T05:00:00+5:302021-10-24T05:00:07+5:30
सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुक्याचे स्थळ असलेल्या कारंजा येथे शिक्षणासाठी येण्यास सुरुवात झाली आहे. यात वाघोडा, तरोडा, काकडा, परसोडी, लोहारी, सावंगा, भारसिंगी येथील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. परंतु, काटोल आगारातून बसेस नियोजित वेळेत न सोडल्या जात असल्याने या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशातच ते नियोजित वेळेत महाविद्यालयात न पोहोचू शकत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा..) : नियोजित वेळेत बस येत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत नियोजित वेळेत बसेस सोडण्यात याव्या या मुख्य मागणीसाठी शनिवारी संतप्त विद्यार्थ्यांनी कारंजा बसस्थानकात लालपरीचा रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे कारंजा बसस्थानक प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाअंति आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. अशातच सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुक्याचे स्थळ असलेल्या कारंजा येथे शिक्षणासाठी येण्यास सुरुवात झाली आहे. यात वाघोडा, तरोडा, काकडा, परसोडी, लोहारी, सावंगा, भारसिंगी येथील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. परंतु, काटोल आगारातून बसेस नियोजित वेळेत न सोडल्या जात असल्याने या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशातच ते नियोजित वेळेत महाविद्यालयात न पोहोचू शकत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काटोल आगाराच्या बेताल कारभारामुळे हैराण झालेल्या संतप्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिवसेनेचे संदीप भिसे, व धनराज बैगने यांच्या नेतृत्त्वात कारंजा बसस्थानकावर धरणे देत बसेसची वाट रोखली. यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती. आंदोलनकर्त्यांची मागणी जाणून घेतल्यावर काटोलचे आगार व्यवस्थापन व तळेगावचे आगार व्यवस्थापक यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर तळेगावच्या आगार व्यवस्थापकांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. सकारात्मक चर्चेअंति देण्यात आलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलनकर्त्यांनीही आंदोलन मागे घेतले.