वर्धेत आढळला दुर्मिळ ‘सर्वाशनी’ गिधाड
By admin | Published: November 11, 2016 01:52 AM2016-11-11T01:52:37+5:302016-11-11T01:52:37+5:30
निसर्गात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेले, निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिधाड पक्षांच्या सर्वच प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत
पर्यावरणाचा सफाई कामगार : बहार नेचर फाउंडेशनने केली नोंद
वर्धा : निसर्गात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेले, निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिधाड पक्षांच्या सर्वच प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विदर्भातूनही गिधाडांचा जवळ जवळ सफाया झाला असताना काल बुधवारी एन्व्हारमेंटल रिसर्च आणि कन्झर्वेशन सोसायटी तसेच बहार नेचर फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य पराग दांडगे यांनी सर्वाशनी गिधाडाची वर्ध्यात नोंद घेतली.
विस्तीर्ण विदर्भात क्वचितच आढळणारा सर्वांशनी गिधाड पक्षी हाडफोडी गिधाड म्हणूनही ओळखल्या जातो. अगदी लहान आकाराची हाडेसुद्धा चोचीने उचलून ती गडांवर आपटून फोडून त्यातील मगज खाण्यात या पक्षांचा हातखंडा असल्याचे पक्षीमित्रांकडून सांगण्यात आले आहे.
मातकट करड्या रंगाच्या या गिधाडाचा आकार गिधाडांच्या इतर प्रजातीपेक्षा लहान असतो. चोच व डोळे पांढरे किंवा पिवळे असतात. हाडफोडी गिधाडाचे मूळ अस्तित्त्व युरोप, आफ्रिकेत असून ते अमेरिका खंडातही आढळतो. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन आॅफ नेचरने सर्वाशनी गिधाडाला संकटग्रस्त पक्षी प्रजाती म्हणून घोषित केले आहे. जगभरात या गिधाडाच्या संवर्धनासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
पवनचक्कीच्या पात्यामध्ये होणारे अपघात, अन्नाची कमतरता, वास्तव्य ठिकाणांची कमतरता, विषप्रयोग, गुराढोरांवर होणारा डायक्लोफिन्याक या वेदनाक्ष्यामग इंजेक्शनचा अतिवापर, शेतात किटकनाशकांचा अतिवापर अशा समस्यांना तोंड देत गिधाड पक्षी अस्तित्वाची लढाई लढत आहेत. येत्या २० ते २५ वर्षांत एकही गिधाड शिल्लक न राहिल्यास आपल्याला नवल वाटू नये.
शेतीमधील किटकनाशकांच्या अतिवापरामुळे, चाऱ्यामार्फत त्यातील विषारी घटक गुराढोरांच्या शरीरात जातात, अशी जनावर दगावल्यावर गिधाडांनी खाल्ल्यास ती विषारी तत्वे गिधाडांच्या अड्यांना ठिसूळ बनवितात, अशी अंडी परिपक्व होण्याआधीच फुटतात. ज्यांचा थेट परिणाम प्रजननावर होऊन संख्या रोडावत आहे. विदर्भात दुर्मिळ असणाऱ्या या गिधाडांच्या मोजक्याच नोंदी उपलब्ध असून वर्ध्यात २००७ मध्ये पराग दांडगे यांनीच त्याची नोंद घेतली होती. या दुर्मिळ पक्षाच्या नोंदीमुळे वर्धेतील पक्षीमित्र सुखावले असून बहार नेचर फाऊंडेशनचे किशोर वानखेडे, डॉ. बाबाजी घेवडे, डॉ. जयंत वाघ, रवींद्र पाटील, जयंत सबाने, वैभव देशमुख, दिलीप विरखडे व राहुल तेलरांधे इत्यादींनी आनंद व्यक्त केला आहे.(प्रतिनिधी)
विषारी औषधांच्या वाढत्या वापरामुळे प्रजात धोक्यात
शेतकऱ्यांकडून मध्यंतरी व आजही विषारी औषधांचा वापर वाढविला आहे. या विषाची बाधा झाल्याने जनावरांचा मृत्यू होतो. या जनवरांचे मांस खाण्यात आल्याने या गिधाडांनाही जीव गमवावा लागत आहे.