शासकीय योजना तळागळापर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 06:00 AM2019-11-18T06:00:00+5:302019-11-18T06:00:21+5:30
समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर बांधवांनी एकजुटीने लढा उभारण्याची गरज असून, शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. याकरिता समाजातील तरुणांनी शिक्षणावर भर द्यावा त्यातून आपल्या कुटुंबाला समाजाला आणि देशाला पुढे न्यावे असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी फत्तेपूर येथे आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे अनावरण प्रसंगी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : आदिवासी समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रचलित जमीनदारी व जहागिरदारी पद्धतीविरुद्ध महामानव बिरसा मुंडा यांनी लढा पुकारला. आदिवासी बांधवांसाठी लढलेल्या क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे असून, हा समाज प्रचंड सहनशील, प्रामाणिक, सोशिक आणि कष्टाळू आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत हा समाज विकासाच्या पायरीवर उभा आहे. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊनच केंद्र सरकार आदिवासी समुदायांच्या सशक्तीकरणासाठी कार्य करीत आहे आदिवासी समाजाला केंद्रस्थानी ठेवून सरकारने अनेक निर्णय घेतले आहे.
आदिवासी समाजातील एकही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता २०२० पर्यंत देशातील सर्व तालुकास्तरावर एकलव्य स्कूलची स्थापना करण्यात येणार आहे. आतापंर्यत ४६५ एकलव्य स्कूल बनविण्यात आलेले आहे. तसेच तेथील आदिवासी समाजांना आता आपल्याला मिळत असलेल्या सर्व योजनेचा लाभ मिळणार आहे. आदिवासींसाठी शिक्षण हे फार महत्वाचे आहे, जेणेकरून त्यांना त्यांचे आपले हक्क माहीत असतील आणि सध्याच्या देशाच्या विकासात भाग घेता येईल. आदिवासी समाजाला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी समाजातील युवकांनी उच्च शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे.
समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर बांधवांनी एकजुटीने लढा उभारण्याची गरज असून, शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. याकरिता समाजातील तरुणांनी शिक्षणावर भर द्यावा त्यातून आपल्या कुटुंबाला समाजाला आणि देशाला पुढे न्यावे असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी फत्तेपूर येथे आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे अनावरण प्रसंगी व्यक्त केले.
फत्तेपूर येथे महामानव बिरसा मुंडा उत्सव समिती यांच्या वतीने खासदार रामदास तडस यांच्या सहकार्याने व लोकवर्गणीतून आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा खासदार रामदास तडस यांच्या हस्ते, झाला.
यावेळी देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, पं. स. सभापती विद्या भुजाडे, जि.प. सभापती मुकेश भिसे, जि.प. मयुरी मसराम, सरपंच जयश्री आत्राम, उपसरपंच ज्योती लोखंडे, दीपक फुलकरी, अरविंद झाडे, दशरथ भुजाडे, सरपंच गजानन हिवरकर, सरपंच वैभव श्यामकुंवर, प्रवीण लोखंडे, वामनराव मसराम, प्रकाश ताकसांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश ताकसांडे तर संचालन रजत मसराम यांनी केले. आभार प्रकाश आत्राम यांनी मानले. कार्यक्रमाला सदस्य रमेश मगरदे, सदस्य नाना चौधरी, शंभरकर, विजय वाढवे, राजेंद्र मसराम, गजानन आत्राम, दिनेश येरणे, सुनील चिडाम, सोपान आ़ात्राम, विकास आत्राम, नितीन सोयाम, तुळशीराम आत्राम व मोठ्या संख्येने आदिवासी समाजबांधव व गावकरी उपस्थित होते.