बाभुळगाव येथे कोंडवाडयात साकारले वाचन घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:37 PM2018-03-03T23:37:35+5:302018-03-03T23:37:35+5:30
माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्थेच्या 'वाचन संस्कृति चळवळ' अंतर्गत बाभूळगांव (खोसे) येथे कोंडवाड्यात बिरसा मुंडा वाचन घर सुरु करण्यात आले आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्थेच्या 'वाचन संस्कृति चळवळ' अंतर्गत बाभूळगांव (खोसे) येथे कोंडवाड्यात बिरसा मुंडा वाचन घर सुरु करण्यात आले आहे. 'पुस्तक आपल्या दारी व चालते-फिरते वाचनालय' उपक्रमाचे उद्घाटन संस्था अध्यक्ष विजय पचारे यांनी केले.
यावेळी मंचावर गावचे पोलिस पाटील रामू बाभळी होते. प्रमुख पाहुणे तालुका समन्वयक विक्की बिजवार, तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष दिनेश वाघमारे, ग्रा.प.सदस्य मुरलीधर टावरी, सुरेश जवूळकर, बचत गट अध्यक्ष निलिमा भलावी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गावागावत वाचन संस्कृती रूजविणे, युवक व विद्यार्थ्यांना वाचनाची व पुस्तकाची आवड निर्माण व्हावी. ग्रामीण भागात शिक्षण व उच्च शिक्षण घेण्याबाबत प्रसार, प्रचार व्हावा. तळागळातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा देण्याची मानसिकता तयार व्हावी म्हणून माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्था कार्यरत आहे. वाचन संस्कृती चळवळ ही लोकचळवळ व्हावी. या चळवळीला अधिक बळकट करण्याकरिता सर्व स्तरातून जुन्या-नव्या पुस्तकांचे दान संस्थेकडून मागविण्यात येते. या उपक्रमातून ग्रामीण भागात वाचन संस्कृती निर्माण करण्याचे ध्येय असल्याहे विजय पचारे यांनी सांगितले.
बार्टीचे विक्की बिजवार यांनी संस्थेच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाचणाची प्रेरणा मिखत असल्याचे सांगितले. शिक्षणाचा प्रचार व प्रसारासाठी याचा चांगला उपयोग होईल. ग्रामीण तरुणाई नवीन समाजमाध्यमे वापरत असताना त्याला पुस्तकांची जोड दिल्यास ज्ञान अद्यावत करता येईल. ग्रामीण युवकांनी शैक्षिणक कार्य करण्याचे आवाहन केले. तर रामू बाभळी यांनी बिरसा मुंडा वाचनघर सांभाळण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे. जागा मिळत नसल्याने कोंडवाड्याचा वापर केल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेने शेतकरी, कष्टकरी व मजूर वर्गाच्या मुलाबाळानी शिकावं, उच्च शिक्षित व्हावे, स्पर्धा परीक्षा द्याव्या म्हणून हे कार्य हाती घेतले आहे. गावात वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी सर्वच प्रयत्नशील राहणार असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे आयोजन बिरसा मुंडा वाचन संस्कृती समितीचे एकनाथ पेंदाम, शुभम भूसे यांनी केले. संचालन निलेश मेश्राम यांनी केले तर आभार संस्थेचे कार्यवाहक सागर डबले यांनी मानले. ग्रा.पं.सचिव प्रवीण चव्हाण यांनी काही पुस्तके संस्थेला दिली. कोंडवाडा येथे वाचन घर सुरू करण्याची परवानगी दिली. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शालिकराम मोकाडे संस्थेला १८० पुस्तके भेट दिली तर प्रवीण चिंचोळकर यांनी ५० पुस्तके दिली. ग्रामस्थांनी जवळपास १०० पुस्तके दान स्वरुपात दिल्याने येथे वाचन घर सुरू करता आले, असे डवले यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कार्यवाहक अमर केराम, विशाल आमटे संस्थेचे सर्व सदस्य आणि कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला मंडळ, बिरसा मुंडा मंडळ यांनी सहकार्य केले.