जगातील पहिले प्राकृतिक जीवन विद्यापीठ होणार साकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 10:42 PM2017-11-14T22:42:19+5:302017-11-14T22:42:54+5:30
गत अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महात्मा गांधी प्राकृतिक जीवन विद्यापीठाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : गत अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महात्मा गांधी प्राकृतिक जीवन विद्यापीठाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. या विद्यापीठाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जगातील पहिले विद्यापीठ म्हणून याचे नाव लौकिक होणार आहे. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील एक विद्यापीठ म्हणून याचे नाव आहे.
सेवाग्राम-करंजी मार्गावर आणि सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने दिलेल्या जागेवर प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचा या अभ्यासक्रम या विद्यापीठात करण्यात येणार आहे. या प्रकारातील विविध अभ्यासक्रम येथे सुरू होणार आहे. प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचा प्रारंभ महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमातूनच केला होता. यामुळे या पद्धतीला विशेष महत्त्व आहे. येथे निर्माण होत असलेल्या या विद्यापीठाचे १५ रोजी वास्तुपूजन आणि उपचार पद्धतीने विद्यापीठाला प्रारंभ होणार आहे
प्राकृतिक चिकित्सा समिती, राजघाट दिल्ली यांच्या अंतर्गत हे विद्यापीठ असून १ डिसेंबर २००७ रोजी खा. जनार्धन द्विवेदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होत. पण आर्थिक अडचणीमुळे अनेकदा बांधकाम रखडले. आर्थिक मदत जशी मिळाली तशी कामे व्हायला लागली. कामाना गती मात्र नव्हती. यामुळे गांधीवादींमध्ये शंका निर्माण होवून जीवन विद्यापीठ साकार होईल का ? असा प्रश्न होता. ऐवढेच नाही तर या विद्यापीठाला राष्ट्रपित्याचे नाव होते बापूंची श्रद्धा या चिकित्सेवर असल्याने विद्यापीठ बनलेच पाहिजे अशी भावना समितीची व गांधीजनांची होती. आता ती पूर्णत्वास आली आहे.
इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. आवश्यक ते साहित्य येथे ठेवण्यात आले आहे. डॉ. प्रशांत तळवेकर आणि त्यांच्या दोन सहाय्यकांची नेमणूक झाली आहे. सर्व उपचार पद्धती या ठिकाणी देण्यात येणार आहे. आयुर्वेदिक बगीचा, सेंद्रीय शेती, निवासस्थाने आदिंची निर्मितीही येथे होणार आहे. नॅचरोपॅथी डिप्लोमा अॅण्ड डिप्लोमा फॉर योगा असा अभ्यासक्रमही येथे सुरू होणार आहे. भविष्यात याच ठिकाणी दवाखाना बनविण्याचा मानस असल्याचे समितीचे महामंत्री नारायणदास भट्टाचार्य यांनी सांगितले.