पावसाच्या पाण्याचे केले बोअरवेलमध्ये पुनर्भरण
By Admin | Published: June 29, 2016 02:13 AM2016-06-29T02:13:06+5:302016-06-29T02:13:06+5:30
आठ ते दहा वर्षांपूर्वी प्रा. विवेक देशमुख यांनी सावंगी (मेघे) येथे घर बांधायला सुरुवात केली. घराच्या अंगणात बोअरवेल केली; पण एक वर्षातच ती आटली.
सावंगी (मेघे) येथील प्रयोग : पहिली बोअरवेल आटल्याने दुसरी खोदून केली उपाययोजना
वर्धा : आठ ते दहा वर्षांपूर्वी प्रा. विवेक देशमुख यांनी सावंगी (मेघे) येथे घर बांधायला सुरुवात केली. घराच्या अंगणात बोअरवेल केली; पण एक वर्षातच ती आटली. परिसरात एकमेव घर असल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे दुसरी बोअर करावी लागली. हे करीत असतानाच आता पाणीटंचाई जाणवू नये म्हणून त्यांनी उपाययोजना केली. छतावरील पावसाचे पाणी आणि वाया जाणारे पाणी जुन्या आटलेल्या बोअरमध्ये सोडत पुनर्भरण केले. यातून त्यांनी जलमित्राची भूमिका साकारली.
कृषी शास्त्राचे शिक्षक असल्याने पाण्याचे नियोजन व पूर्तता कशी करावी, हे प्रा. विवेक यांना कळत होते. अंगणातील बोअर आटल्याने दुसरी बोअरवेल खोदणे गरजेचे होते. त्यांनी दुसरी बोअरवेल केली; पण हे करूनच ते थांबले नाही तर पावसाचे छतावरील पाणी पाईपद्वारे एकत्र करून ते जुन्या १५० फुट बोअरवेलमध्ये सोडले. यामुळे वर्षभर पडणारे पावसाचे छतावरील आणि अंगणातील सर्व पाणी जुन्या बोअरवेलमध्ये जाते. परिणामी, गत सात-आठ वर्षांत प्रा. देशमुख यांच्या दुसऱ्या बोअरवेलचे पाणी कधीही आटले नाही.
हा प्रयोग पाहून सावंगी (मेघे) येथील सर्व नागरिकांनीही भूजल पुनर्भरणाचा प्रयोग आपापल्या घरी राबविला आहे. यातून सावंगी (मेघे) येथे छतावरील पाणी जमिनीत मुरविण्याची एकप्रमारे चळवळच सुरू आहे. शिवाय एक व्यक्ती एक झाड ही मोहिमही येथील नागरिकांच्या साह्याने राबविण्यात येत आहे. स्वत:चा आॅक्सीजन व स्वत:चे पाणी, याची व्यवस्था आपण स्वत: करण्याची गरज निर्माण झाली आहे. दहा वर्षांपूर्वी प्रा. देशमुख यांनी ही बाब लक्षात घेतल्याने सावंगी येथे रेन वॉटर हार्वेस्टींगचे महत्त्व नागरिकांनाही कळले आहे. मुख्यत: नवीन घर बांधले जात असताना ते तेथे जातात. खर्चात खर्च होऊन जातो, असे समजावून सांगत त्यांच्याकडून रेन वॉटर हॉर्वेस्टींगचा प्रयोग करून घेतात. यात ९० टक्के लोक समर्थन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वत:पासून सुरू झालेला रेन वॉटर हार्वेस्टींगचा हा प्रयोग आता एक चळवळ होत असून खरे जलमित्र घडविले जात असल्याचेच दिसते.(कार्यालय प्रतिनिधी)