खेळातून परस्पर आदरभावाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:34 AM2017-11-26T01:34:33+5:302017-11-26T01:34:49+5:30
ऑनलाईन लोकमत
वर्धा : कार्यालयीन कामकाजाच्या तणावातून थोडी उसंत मिळावी याकरिता जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. अशा स्पर्धांमुळे नव्या उत्साहाने कर्मचारी कामाकरिता अग्रेसर राहतील. खेळ भावनेने या स्पर्धा होत आहेत. खेळाच्या माध्यमातून परस्पर आदरभाव निर्माण होतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांमध्ये पुन्हा संथ गतीने का होईना मैदानी खेळाचे महत्त्व अनेकांच्या लक्षात येत आहे, अशा भावना जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी व्यक्त केल्या.
येथील जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. मंचावर जि.प. उपाध्यक्ष कांचनताई नांदुरकर, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, सभापती नीता गजाम, मुकेश भिसे, जि.प. सदस्य तथा विरोधी पक्षाचे गटनेते संजय शिंदे, विजय आगलावे यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाचे खातेप्रमुख व जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील आठही पंचायत समितीतील कर्मचाºयांनी त्यांचे संघ स्पर्धेत उतरविले आहे. खेळाडू व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहने सहभागी झाले आहे. दिवसभर मैदानी स्पर्धा आणि सायंकाळच्या सुमारास सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन येथे आहे. यात अनेक शिक्षकांकडून विविध कार्यक्रमांचे सादरीकरण होत आहे.
तीन दिवस चालणाºया या स्पर्धेत दुसºया दिवशी विविध कार्यक्रम सादर करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमाला जि.प. सदस्य अंकिता होले, राजश्री राठी, विनोद लाखे, नुतन राऊत, शूकेश्वनी धनविज, सुमित्रा मलघाम, प.स.सभापती गंगाधर कोल्हे, महानंदा ताकसांडे, अतिरिक्त मुख्यकार्यकारणी अधिकारी डॉ. करुणा जुहीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्षांची फलंदाजी अन विरोधकांची गोलंदाजी
स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी क्रिकेट सामन्यात हाती बॅट घेवून फलंदाजी केली. यावेळी विरोधी पक्षाचे गटनेता संजय शिंदे यांनी गोलंदाजी केली. गोलंदाजी दरम्यान टाकलेले चेंडू ‘वाईड बॉल’ पडले असता अध्यक्षांनी फलंदाज पाहून बॉलर भिले, असे म्हणताच नंतरचा चेंडू यष्टीवर आला. तो अध्यक्षांनी तसाच टोलावला. तो सहा रनसाठी गेला की चार, हे मात्र माहीत नसल्याचे अध्यक्ष मडावी म्हणाले.