बँकेतली ठेव परत करा; नाहीतर इच्छामरणाची परवानगी द्या
By Admin | Published: June 9, 2017 02:04 AM2017-06-09T02:04:07+5:302017-06-09T02:04:07+5:30
मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी कष्टातून पै पै उभारलेली रक्कम जिल्हा बँकेत जमा केली.
गिरडच्या कापसे कुटुंबीयांची मागणी : लोकप्रतिनिधीसह जिल्हाधिकाऱ्यांना घातले साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी कष्टातून पै पै उभारलेली रक्कम जिल्हा बँकेत जमा केली. आता गरजेच्या वेळी ही बँक अवसायनात निघाली. यामुळे बँकेतून रक्कम मिळणे अशक्य होत असल्याने विद्यार्थ्याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांना इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. या संदर्भात खासदार, आमदार, संबधित बँकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे; मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप राहुल कापसे याने तक्रारीतून केला आहे.
गिरड येथील शेतकरी यादव कापसे (५०) यांनी काटकसर करीत स्थानिय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २ लाखांची ठेव जमा केली. गत दोन वर्षांपासून त्यांची शेती तोट्यात आल्याने उसनवार पैशाचा बोझा वाढत आहे. शिवाय त्यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे कर्ज आहे. या कजार्ची परतफेड करणे आणि नवीन पिककर्जाची उचल करण्यासाठी पैशाची तडजोडीच्या चिंतेत आहे.
यादव कापसे यांना तीन मुल आहेत. यातील मोठा मुलगा घरच्या नाजूक परिस्थितीमुळे शिक्षण घेवू शकला नाही. लहान दोन मुले चांगली शिकावी यासाठी जिल्हा बँकेत २ लाख रुपये जमा केले होते. या पैशाच्या आधारावर त्यांचा लहान मुलगा राहुल कापसे हा नागपूर येथे औषधी निर्माणशास्त्र विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तर युगल कापसे इयत्ता बारावी उत्तीर्ण झाला. त्याला आयटीआय विभागात शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे. राहुलच्या शिक्षणासाठी प्रवेश शुल्क इतर खर्चाकरिता रकमेची गरज आहे. मात्र बँकेत जमा असलेली रक्कम शिक्षणाच्या कामासाठी परत मिळत नसल्याने कापसे परिवार हतबल झाला आहे.
ही रक्कम मिळावी याकरिता राहुल कापसे याने खासदार, आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. मात्र त्यांच्याकडून कुठलीही रक्कम मिळाली नाही. संबधित बँकेच्या जिल्हा व्यवस्थापक मंडळाच्यावतीने बँकेच्या धोरणाप्रमाणे कारवाई करण्याची सूचना करण्यात आली. या सूचनांच्यावर कारवाई पुढे सरकली नसल्याने कापसे कुटुंबियांना आर्थिक अडचणीच्या मरणयातना सोसाव्या लागत असल्याचा आरोप आहे. तर पैशाच्या अडचणीमुळे औषधी निर्माण शास्त्र विभागात शिक्षण घेणाऱ्या राहुल कापसे याला शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे.
संपूर्ण रक्कम देण्याची मागणी
सदर सभासद खातेदाराची बँकेच्या प्रशासकीय मंडळाने ठरविलेल्या धोरणानुसार जमा खात्यातून १० टक्के रक्कम अदा करण्यात आलेली आहे. खातेदाराला फिक्स डीपॉझीटवर कर्ज देण्यास बँक तयार आहे. पण खातेदाराचा त्याला विरोध आहे. रकमेची मुदत होण्याअगोदर संपूर्ण रक्कम मिळावी असा खातेदाराचा आग्रह आहे.
बँकेच्या रक्कम देण्याच्या नियमानुसार दहा टक्के रक्कम अदा केल्याने पुढील धोरण ठरेपर्यंत अजून रक्कम देण्यास बँक असमर्थ आहे.
- मदन मुंजेवार, शाखा व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँक, शाखा समुद्रपूर