स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना फटकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:10 AM2017-12-20T00:10:38+5:302017-12-20T00:11:26+5:30
येथील रेल्वे स्थानकाची पाहणी केंद्रीय यात्री सुविधा समितीचे सदस्य इरफान खान यांनी मंगळवारी दुपारी केली. यावेळी त्यांनी सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील रेल्वे स्थानकाची पाहणी केंद्रीय यात्री सुविधा समितीचे सदस्य इरफान खान यांनी मंगळवारी दुपारी केली. यावेळी त्यांनी सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली. रेल्वे स्थानकावरील सर्व फलाटांची पाहणी करताना नजरेत पडलेल्या अस्वच्छतेच्या कारणावरून अधिकाºयांना खडसावले. यावेळी त्यांनी प्रवाशांशी चर्चा केली.
केंद्रीय यात्री समितीचे सदस्य इरफान खान यांनी प्रारंभी वर्धा रेल्वे स्थानक परिसराची बारकाईने पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात आवश्यक त्या ठिकाणी कचरापेटी लावण्याच्या सूचना दिल्या. शिवाय त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात कुणीही थुंकल्यास किंवा कचरा टाकल्यास काय दंड होऊ शकतो याची माहिती नागरिकांना देणारे सूचना फलक लावण्याचे सुचविले. त्यांच्यासोबत भाजपा अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी, प्रदेश सचिव बिस्मील्ला खान, शहर अध्यक्ष नवशाद शेख, अफजल खान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी वर्धा रेल्वे स्थानक प्रमुख डी.एस. ठाकुर, टी.जी. पुष्पलवार, डी.एम. तिजारे, दिनेश सिंग आदींची उपस्थिती होती.
बापू कुटीच्या प्रतिकृतीचे कौतुक
वर्धा रेल्वे स्थानक परिसरात सेवाग्राम येथील बापू कुटीची प्रतिकृती लावण्यात आली आहे. त्याची पाहणी इरफान खान यांनी केली. याचे त्यांनी कौतुकही केले. त्यानंतर त्यांनी रेल्वे फलाटावर रेल्वेगाडीच्या प्रतीक्षेत एका महिलेशी संवाद साधला. सदर महिलेने अमरावती पॅसेंजर गत काही दिवसांपासून वेळेवर येत नसल्याचे सांगितले. त्यावर इरफान खान यांनी इंग्रजकालीन असलेल्या रेल्वे रुळाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे प्रवाशांना त्रास होत असल्याचे सांगत प्रवाशांनीही सहकार्य करावे, असे आवाहन केले.