अवैध होर्डिंगकडे पालिका प्रशासनाचा कानाडोळा
By admin | Published: September 8, 2015 04:14 AM2015-09-08T04:14:42+5:302015-09-08T04:14:42+5:30
शहरात बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला जाहिरातींकरिता मोठमोठी लोखंडी फलके लावण्यात आली आहेत. त्यातील
वर्धा : शहरात बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला जाहिरातींकरिता मोठमोठी लोखंडी फलके लावण्यात आली आहेत. त्यातील काही फलके अधिकृत आहे तर काही अनधिकृत असल्याचे दिसून आले आहे. या अनधिकृत फलकांना मात्र पालिकेकडून मुकसंमती असल्याचे दिसून आले आहे. ही अनधिकृत फलके काढण्याकरिता त्यांच्याकडून अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. यातील काही फलके रस्त्यावर आल्याची तक्रार बऱ्याच नागरिकांनी पालिकेकडे केली आहे. यामुळे पालिकेत सुरू असलेल्या या गोरखधंद्यावर आळा घालण्याची मागणी होत आहे.
मोठमोठ्या कंपन्यांच्या उत्पादनासह वर्धेतील राजकीय नेत्यांच्या जाहिरातील लावण्याकरिता शहरातील मुख्य चौकात बरीच फलके लावण्यात आली आहेत. त्यातून बराच कर पालिकेला मिळत आहे. यात वर्धेत या फलकांवर जाहिरातील लावण्याचा करार कुण्या एका जाहिरात एजन्सीसोबत करण्यात आल्याची माहिती आहे. या जाहिरात कंपनीकडून या फलकावर जाहिराती लावण्याचे काम होत आहे. तिच्याकडून लावण्यात आलेली फलके परवानगी घेत लावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
परवानगी असलेल्या फलकांच्या खाली नगर परिषदेच्यावतीने परवानगी देण्याची तारीख व त्याचा क्रमांक लावण्यात आला आहे. ज्यांच्याखाली अशी फलके आहेत ते अधिकृत तर ज्या फलकांखाली क्रमांक व इतर माहिती देणारे फलक नसेल ते अवैध असल्याचे समजावे असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. अशी बरीच फलके शहरात आहेत. याची माहिती पालिकेच्या संबंधीत विभागाला आहे; मात्र त्यांच्याकडून यावर कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. तर या संदर्भात कोणी विचारणा केल्यास त्याची माहिती संबंधीत कंत्राटरापर्यंत पोहोचविण्याचे काम या विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचे येथे समोर आले आहे.
शहरात लावण्यात येत असलेल्या जाहिरातीची माहिती पालिकेला असावी, त्यांच्याकडून तशी परवानागी घेणे बंधनकारक असून लावण्यात येत असलेल्या जाहिरातींवर ती लावण्याची व ती किती दिवस राहील याचा संपूर्ण उल्लेख असावा असे न्यायालयाचे आदेश आहेत. वर्धेत मात्र तसे होत नसल्याचे दिसून आले आहे. यावर कारवाई करण्याचे अधिकारी पालिकेला आहेत. मात्र वर्धेत बऱ्याच दिवसांपासून कायमस्वरून मुख्याधिकारी नसल्याने कारवाई करण्यात आली नसल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. आता पालिकेला अघिकृत मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाले आहेत. त्यांच्याकडून यावर कारवाईची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)
नागरिकांची तक्रार
४वर्धेतील बॅचलर मार्गावरील पारस आईस फॅक्ट्री परिसरात नव्याने एक फलक लाावण्यात आले आहे. हा फलक रस्त्यावर आल्याची तक्रार नागरिकांनी पालिकेकडे केली आहे. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याचा आरोप होत आहे.
कंत्राटदाराशी साटेलोटे ?
४शहरात लावण्यात येत असलेल्या फलकांसंदर्भात ‘लोकमत’ कार्यालयातून पालिकेशी संपर्क साधण्यात आला. फलकांची माहिती संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला विचारताच त्याने थेट फलकाचा कंत्राट असलेल्या कंत्राटदाराशी संपर्क केला. यावर कत्राटदाराने ‘लोकमत’ कार्यालयाशी संपर्क साधत आपण परवानगीचे फलक लावल्याचा पाढा वाचला. यामुळे या कंत्राटदाराशी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे चांगलेचे साटेलोटे असल्याचे स्पष्ट होत असून याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
जाहिरातीच्या फलकासंदर्भात माहिती घेण्यात येईल. मला येथे येऊन मोजकेच दिवस झाले आहेत. शिवाय या संदर्भात न्यायालयाने काही नवे निर्देश ुिदले आहेत. त्या निर्देशानुसार वर्धेत कारवाई करण्यात येईल. नियमानुसार परवानगी असलेल्या फलकांना सोडून इतर प्रकरणात फौजदारी कारवाईचेही प्रावधान आहे. येत्या दिवसात यावर कारवाई करण्यात येईल.
-अश्विनी मळे, मुख्याधिकारी न.प. वर्धा