राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत मनापासून सहभागी व्हा
By admin | Published: February 7, 2017 01:12 AM2017-02-07T01:12:44+5:302017-02-07T01:12:44+5:30
आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे.
श्वेता पालवे : देवळी पंचायत समितीत कार्यशाळा
देवळी : आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम केवळ शासनाच्या सूचना आणि आपली नोकरी म्हणून पार न पाडता जंतांपासून होणाऱ्या आजारापासून बालाकांना वाचविण्याकरिता आपले कर्तव्य म्हणून राबवा, अशा सूचना गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी केल्या. देवळी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या.
राष्ट्रीय जंतनाशक दिवस यशस्वीपणे पार पाडण्यासाठी देवळी पंचायत समिती येथे सोमवारी कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला सहायक गट विकास अधिकारी रूपाली बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.एम. दिदावत, पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी सतीश आत्राम यांच्यासह तालुका स्तरीय नोडल शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १० फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला मुलींना अल्बेंडाझोलची गोळी देण्यात येणार आहे. या संदर्भात माहिती देताना डॉ. दिदावत म्हणाले, बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमिदोष हा मातीतुन प्रसारित होणाऱ्या जंतामुळे होतो. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे. या जंतांमुळे रक्तक्षयाची लागण होते. १५ ते १९ वर्ष वयोगटातील ५६ टक्के, ३० टक्के किशोरवयीन मुलामध्ये रक्तक्षय आढळण्याचे प्रमाण असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामुळे भारत सरकार यांनी वर्षातून दोनवेळा राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनाशा उद्देश हा १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर १० फेब्रुवारी रोजी १ दिवसीय जंत नाशक गोळी देण्यात येत आहे. यावेळी जंताच्या प्रकाराचीही माहिती देण्यात आली. बालकाची बौद्धीक आणि शारीरिक वृद्धी उत्तम होण्याकरिता त्याच्या शरीरात हे जंत नसणे अनिवार्य असल्याचे यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी सांगितले. यावेळी तर राष्ट्रीय जंतनाशक दिनाबाबत सहाय गट विकास अधिकारी रुपाली बांगर, गट शिक्षणाधिकारी सतीश आत्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोल्हटकर यांनी विचार व्यक्त केले.
कार्यशाळेला जिल्हा परिषद व खासगी संस्थेतील नोडल शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांनी आपल्या शंका उपस्थित केल्या. त्या शंकाचे निराकरण डॉ. दिदावत यांनी केले. कार्यशाळेचे संचालन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले तर आभार आरोग्य विस्तार अधिकारी प्रमोद लकडे यांनी मानले. कार्यशाळेकरिता तालुका आरोग्य सहय्यक शेख हुसेन, बबीता ताकसांडे, कुष्ठरोग तंत्रज्ञ राजू शेलोटे, गोटेकर, पद्मा खरसान, शिरसाट आदींनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)