Coronavirus in Wardha; वर्धा जिल्ह्यात बाहेरून आलेल्या २ हजारांहून अधिक व्यक्तींची नोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 07:00 AM2020-03-26T07:00:00+5:302020-03-26T07:00:06+5:30
पुणे, मुंबई सोबतच इतर जिल्हे आणि राज्यातून वर्धा जिल्ह्यात आलेल्या २ हजार ३२७ लोकांच्या गृह विलगिकरणाची प्रक्रिया प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार आणि प्रत्येक गावातील, आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांनी गावात केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात आतापर्यंत इतर जिल्ह्यातून येणाऱ्या २३२७ लोकांची नोंदणी झाली आहे. यामध्ये, पुणे, मुंबई सोबतच इतर जिल्हे आणि राज्यातून आलेल्या व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे. या २ हजार ३२७ लोकांच्या गृह विलगिकरणाची प्रक्रिया प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आहेत. राज्य शासनाने लॉक डाऊन, सार्वजनिक वाहतूक बंद केली, तेव्हा इतर जिल्ह्यात असलेल्या नागरिकांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कोरोनाबाधित शहरातून वर्धा जिल्ह्यात आलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे आपल्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने अशा प्रदेशातून आलेल्या व्यक्तींना त्यांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन केले होते. तसेच गाव आणि शहरातील आशा, अंगणवाडी सेविका, यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणजे प्रशासनाकडे आतापर्यंत २ हजार ३२७ व्यक्तींची नोंदणी झाली आहे. यामध्ये वर्धा - ८१२, हिंगणघाट-१०१, आर्वी-१००, आष्टी -३२०, कारंजा-७१, समुद्रपूर-३२ देवळी-१८९, सेलू -७०२ नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये केवळ पुणे, मुंबईहून १२०० व्यक्ती आल्या आहेत.
१४ दिवस गृह विलगिकरण
आता आरोग्य विभाग प्रत्येकाला १४ दिवस गृह विलगिकरणात ठेवण्याची प्रक्रिया करीत आहे. प्रत्येकाच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येत आहे. तसेच गृह विलगिकरणात घ्यावयाची काळजी इत्यादींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
प्रत्येक व्यक्तीसाठी गावातील आशा, अंगणवाडी, ग्रामसेवक, आरोग्य सहाय्यक यांना गृह विलगिकरणात असलेली व्यक्ती सूचनांचे पालन करते की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिलेली आहे. यातील २2 व्यक्ती आयसोलेशन मध्ये आहेत. त्यांना किंचित ताप असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात परदेशी प्रवास करून आलेल्या व्यक्तींची संख्या ११२ वर
जिल्ह्यात कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तींची संख्या आता ११२ झाली आहे. यापैकी ७६ व्यक्तींना गृह विलगिकरणातून बाहेर काढले आहे. तर आतापर्यंत ९ व्यक्तींच्या कोरोना विषाणूच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या आहेत. यामध्ये सेवाग्राम येथून - २, हिंगणघाट -२, सावंगी - १ आणि सामान्य रुग्णालय - ४ असे एकूण ९ व्यक्तीचे स्त्राव पाठविण्यात आले होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीत परदेशातून आलेल्या ३६ व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत.