२३ हजार ५०० ज्येष्ठांची स्मार्ट कार्डकरिता नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 06:00 AM2019-12-29T06:00:00+5:302019-12-29T06:00:16+5:30
जिल्ह्यातील काही आगारात स्मार्ट कार्ड काढताना ज्येष्ठांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अमूक कागदपत्रे, तमूक कागदपत्रे आणण्याबाबत वेळेवर सांगितले जात आहे. त्यामुळे ज्येष्ठांना एकाच कामाकरिता वारंवार येरझारा कराव्या लागत आहेत. बोगस प्रवाशांना अटकाव व्हावा या हेतूने एसटी महामंडळाने ही योजना अंमलात आणली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना सवलत हवी असल्यास काही महिन्यांपूर्वी स्मार्ट कार्ड बंधनकारक केले. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १ जानेवारीपासून स्मार्ट कार्ड नसल्यास एसटीतून प्रवास करताना ज्येष्ठांना मिळणारी सवलत बंद होणार आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड काढण्याकरिता ज्येष्ठांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. वर्धा विभागांतर्गत ज्येष्ठांनी २३ हजार ५०० स्मार्ट कार्ड मिळविले आहेत.
जिल्ह्यातील काही आगारात स्मार्ट कार्ड काढताना ज्येष्ठांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अमूक कागदपत्रे, तमूक कागदपत्रे आणण्याबाबत वेळेवर सांगितले जात आहे. त्यामुळे ज्येष्ठांना एकाच कामाकरिता वारंवार येरझारा कराव्या लागत आहेत. बोगस प्रवाशांना अटकाव व्हावा या हेतूने एसटी महामंडळाने ही योजना अंमलात आणली आहे. यात खऱ्या लाभार्थ्यांनाच त्रासाचा सामना करावा लागत आहे. वर्धा विभागांतर्गत वर्धा, आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्या. पंत.), पुलगाव हे आगार आहेत. अल्प मुदत असल्याने स्मार्ट कार्ड मिळावे याकरिता यातील अनेक आगारांत ज्येष्ठ नागरिक ताटकळताना दिसून येतात. काही आगारात अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सौजन्याची वागणूक मिळत नसल्याचीही ज्येष्ठ नागरिकांची तक्रार आहे.
प्रवासावर येणार मर्यादा
यापूर्वी एसटीतून प्रवास करताना सवलतीकरिता किलोमीटरचे बंधन नव्हते. १ जानेवारीपासून मात्र, स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने आता किलोमीटरचेही बंधन असणार आहे. आता एका वर्षात केवळ ४ हजार किलोमीटर प्रवासासाठी सवलत देण्याचा निर्णय परिवहन महामंडळानग घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता ४ हजार किलोमीटरपुढील प्रवास सवलतीत करता येणार नाही. एसटीच्या नव्या स्मार्ट कार्ड अंमलबजावणीनंतर हा निर्णय लागू होणार असल्याचे समजते. ज्येष्ठ नागरिकांना सद्यस्थितीत निमआराम बसमध्ये ५० टक्के, शिवशाहीमध्ये ४५ आणि शिवशाही स्लीपरमध्ये ३० टक्के सवलत दिली जाते. सवलतीमुळे ज्येष्ठ नागरिकांचा एसटीकडे मोठ्या प्रमाणात कल आहे. मात्र, ४ हजार किलोमीटरच्या प्रवासाच्या मर्यादेमुळे प्रवासी संख्या घटण्याची शक्यता आहे. यामुळे एसटीची प्रवासी संख्या आणि उत्पन्नावरही परिणाम होणार आहे.