बंदी असतानाही पानमसाल्याची सर्रास विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:39 AM2018-09-03T00:39:55+5:302018-09-03T00:40:25+5:30
गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखुच्या विक्रीवर राज्यात बंदी घातली असली तरी दारूबंदी जिल्हा असलेल्या वर्ध्यांत याची मनमर्जीने विक्री होत असल्याचे रविवारी लोकमतने केलेल्या स्ट्रिंंग आॅपरेशन दरम्यान उघडकीस आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखुच्या विक्रीवर राज्यात बंदी घातली असली तरी दारूबंदी जिल्हा असलेल्या वर्ध्यांत याची मनमर्जीने विक्री होत असल्याचे रविवारी लोकमतने केलेल्या स्ट्रिंंग आॅपरेशन दरम्यान उघडकीस आले. इतकेच नव्हे तर अनेक खाद्यपदार्र्थ विविध कारणे पुढे करून छोट्या व मोठ्या व्यावसायिक सदर खाद्यपदार्थांवरील नमुद एमआरपीला फाटा देत विक्री करताना आढळून आले. हा प्रकार शासकीय नियमांना तिलांजली देणारा ठरत आहे. शिवाय नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाराच असल्याने संबंधितांनी वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
शहरातील अनेक पानटपरीवर बंदी असतानाही राजरोसपणे पानमसाला विक्री होत आहे. त्याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गत महिन्यात वर्धा शहरासह हिंगणघाट येथे कारवाई करून अन्न व औषध प्रशासनाने शासकीय सोपस्कार पूर्ण केला. त्यांची ही कारवाई केवळ छोट्या व्यावसायिकांविरुद्धच राहिल्याने या कारवाईबाबत उलट-सुटल चर्चाही वर्धा शहरात त्यावेळी झाली. सुगंधीत तंबाखू व पानमसाल्याची साठवणूक करणारे मोठे व्यापारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती असताना केवळ कारवाई छोट्या व्यावसायिकांवर झाल्याने कारवाईबाबतही विविध प्रश्न सुजान नागरिकांकडून उपस्थित केले जात होते. सध्या मोठ्या व्यापाºयांकडून साठवणूक केलेला पानमसाला किरकोळ व्यावसायिकांकडे वळता होत त्याची खुलेआम शहरात व शहराबाहेर विक्री होत आहे. शिवाय पाणी बॉटल, शितपेय, दुध पॅकेट आदी खाद्यपदार्थ चढ्या दराने विक्री होत असल्याचे आजच्या स्ट्रींग आॅपरेशनदरम्यान दिसून आल्याने योग्य कार्यवाही गरजेची आहे.
रेल्वे व बस स्थानकात नियमांना फाटा
रेल्वे व बस स्थानक परिसरात परवाना धारक व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांची विक्री करावी असा नियम आहे. परंतु, सध्या परवाना धारक नसलेल्या अनेक छोट्या व्यावयायिकांकडून रेल्वे व बस स्थानक परिसरात खाद्यपदार्थ विक्री केल्या जात असल्याचे रविवारी दिसून आले.
चिल्लर ऐवजी चॉकलेट
कुठल्याही साहित्यासह खाद्यपदार्थाची खरेदी केल्यानंतर सुटे पैसे त्या ग्राहकाला न देता काही व्यावसायिक चक्क ५० पैसे किंवा १ रुपया किंमतीचे चॉकलेट त्या नागरिकाला देत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
चित्रपटगृहात मनमर्जी
शहरातील चित्रपट गृहात विविध खाद्यपदार्थ विक्री केल्या जातात. मात्र, हे खाद्यपदार्थ विक्री करताना काही चित्रपट गृहात खाद्यपदार्थ्याच्या पाकिटावर नमुद असलेल्या एमआरपी पेक्षा जास्त पैसे नागरिकांकडून घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. इतकेच नव्हे तर गुटखा व खर्रा चित्रपट बघण्यासाठी आलेल्या कुणाच्या खिशात तर नाही ना याची तपासणी चित्रपट गृहातील सुरक्षा रक्षकाकडून केली जात असल्याचे दिसून आले.
झेरॉक्सच्या मोबदल्यात तफावत
शहरात प्रत्येक चौका चौकात झेरॉक्स केंद्र आहे. काही ठिकाणी १ रुपयात तर काही ठिकाणी एका झेरॉक्स कॉपीसाठी २ रुपये घेऊन नागरिकांची आर्थिक पिळवणूकच केली जात असल्याचे दिसून आले.
पेट्रोलपंपांवर वाहनचालकांना चुना
शहरातील काही पेट्रोलपंपावर तेथील कर्मचारी मशीनमध्ये सेट करून वाहनांमध्ये इंधनचा भरणा करीत असले तरी काही पेट्रोलपंपावर तेथील कर्मचारी पेट्रोल व डिझेलचा वाहनात भरणा केल्यानंतर एक रुपयांपेक्षा कमी पैसे परत न देता दांडीच मारतात. दिवसभºयात या कर्मचाºयांकडून अनेकांना चूनाच लावल्या जातो.
इतकेच नव्हे तर काही पेट्रोलपंपावर वाहनचालकांची नजर हटताच वाहनात इंधनाचा भरणा कमी करून नागरिकांची फसवणूक केली जाते.