पुनर्वसन झाले; पण मूलभूत सुविधाच नाही
By admin | Published: December 29, 2014 11:49 PM2014-12-29T23:49:22+5:302014-12-29T23:49:22+5:30
प्रकल्पांकरिता जमिनी संपादित करताना ग्रामस्थांना बेघर व भूमिहीन केले जाते; पण त्यांच्या सोयी, सुविधांकडे लक्ष दिले जात नाही़ असाच प्रकार कारंजा तालुक्यातील मासोद या गावाबाबत घडत आहे़
वर्धा : प्रकल्पांकरिता जमिनी संपादित करताना ग्रामस्थांना बेघर व भूमिहीन केले जाते; पण त्यांच्या सोयी, सुविधांकडे लक्ष दिले जात नाही़ असाच प्रकार कारंजा तालुक्यातील मासोद या गावाबाबत घडत आहे़ गावाचे पुनर्वसन तर केले; पण ग्रामस्थांना मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले़ यामुळे त्यांना खितपत जगावे लागत आहे़
वर्धा जिल्ह्यात अनेक पुनर्वसित गावांबाबत हा प्रकार घडत असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी शासनाला जमिनी का द्यायच्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ कारंजा (घा़) तालुक्यातील मासोद येथे समस्यांनी कळस गाठला आहे़ पुनर्वसनाला २८ वर्षांचा कालावधी लोटला; पण अद्याप गावात रस्ते पोहोचले नाहीत़ नाल्या, पथदिव्यांची व्यवस्थाही करण्यात आलेली नाही़
आर्वी तालुक्यातील महाकाळी येथे १९८६ मध्ये जलायशाची निर्मिती झाली़ या प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा मासोद गावाला त्रास होता़ यामुळे गावाचे पुनर्वसन करण्यात आले़ खरांगणा (मो़) ते कारंजा-कोंढाळी मार्गावरील मुख्य गाव असलेल्या मासोदची लोकसंख्या १३०० च्या आसपास असून घरांची संख्या २०० वर आहे़ पुनर्वसित गाव असल्याने येथे सोयी, सुविधा असतील, असा समज होतो; पण तेथे सुविधांचा दुष्काळच दिसतो़ गावातील मुख्य रस्त्यावर असलेले खड्डे रस्त्यांच्या स्थितीचे दर्शन घडवितो़ मासोद येथील घरांपुढे नाल्यांचे बांधकाम केले नाही़ यामुळे पावसाळ्यात पाण्याचा त्रास सहन करावा लागतो़ बसस्थानक ते गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत़ गावातील अंतर्गत रस्ते कच्चे असून पावसाळ्यात ये-जा करताना चिखल तुडवावा लागतो़ नाल्या नसल्याने डबके साचते़ परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ गावात पथदिवे नसल्याने काळोखात चाचपडावे लागते़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत मासोद येथे मुलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)