पुनर्वसित गावे होत आहेत झुडूपमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:01 AM2017-09-21T00:01:38+5:302017-09-21T00:01:51+5:30
निम्म वर्धा प्रकल्पांतर्गत पुनर्वसित झालेल्या गावातील मोकळे भूखंड, शासकीय भूखंड, अंतर्गत रस्ते तसेच मुख्य रस्त्ये जेसीबीच्या सहाय्याने झुडूपमुक्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : निम्म वर्धा प्रकल्पांतर्गत पुनर्वसित झालेल्या गावातील मोकळे भूखंड, शासकीय भूखंड, अंतर्गत रस्ते तसेच मुख्य रस्त्ये जेसीबीच्या सहाय्याने झुडूपमुक्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सदर झुडूपांमध्ये सरपटणाºया प्राण्यांचा वावर राहत होता. परिसर स्वच्छ केल्या जात असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पुनर्वसित वसाहतीत मोकळ्या शासकीय भूखंडावर तसेच अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झुडप वाढले होते. या झुडूपांमध्ये सरपटणारे प्राणी तसेच रात्रीला जंगली प्राणी संचार करीत होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. प्रकल्पग्रस्त गावातील निम्म वर्धा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या पदाधिकारी, सदस्य तसेच सरपंच, उपसरपंच यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात माजी आमदार दादाराव केचे यांच्या मध्यस्तीअंती लावण्यात आली होती. बैठकीला खासदार रामदास तडस यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. बैठकीत पुनर्वसित वसाहतीला झुडूपमुक्त करण्यासाठी तसेच काही गावातील पिण्याचे पाणी क्षारयुक्त असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यावर फल स्वरूप निम्म वर्धा प्रकल्पातील पुनर्वसित गावांना जेसीबी मशीन गावे झुडूपमुक्त करण्यासाठी देण्यात आली. सर्कसपूर, टोणा, ईठलापूर, राजापूर, अहिरवाडा, अंबिकापुर, निंबोली, नेरी मिझार्पुर या गावातील पिण्याचे पाणी क्षारमुक्त करण्यासाठी जल शुद्धीकरणाची योजना शासन स्तरावर मार्गी लागली आहे. दोन्ही महत्त्वाची कामे पुनर्वसित गावांमध्ये होत असल्याने गावातील नागरीकांना दिलासा मिळाला आहे. गाव परिसरात वाढलेल्या झुडपांचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागत होता. झुडूपे काढली जात असल्याने भीतीचे सावट गावावरून हटले आहे.