पुनर्वसन व भूसंपादनाची कामे वेळीच करा!
By Admin | Published: April 15, 2017 12:35 AM2017-04-15T00:35:49+5:302017-04-15T00:35:49+5:30
पुनर्वसीत गावठाणात वाटप केलेल्या भूखंडाचे गाव नमुना सातबारा तयार करण्याचे कामे जवळपास पूर्ण झाली आहे.
-शैलेश नवाल
वर्धा : पुनर्वसीत गावठाणात वाटप केलेल्या भूखंडाचे गाव नमुना सातबारा तयार करण्याचे कामे जवळपास पूर्ण झाली आहे. ही कामे १०० टक्के पूर्ण करून गाव नमुना सातबारा आॅनलाईन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.
आर्वी, देवळी, वर्धा येथील पुनर्वसन व भूसंपादन आढावा बैठक घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तसेच वर्धा, आर्वी व देवळी येथील तहसीलदार उपस्थित होते. या सभेत नवाल यांनी मार्गदर्शन केले. आर्वी तालुक्यातील वागदा, नांदोरा (काळे), अंबिकापूर येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी प्रस्ताव तयार करावे. निंबोली येथील प्रकल्प्रग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी दौलतपूर येथील भूखंडाचे वाटप करावे. पुनर्वसन गावठाणातील देवळी (पुनर्वसन), पिंपळगाव (भो.), नेरी (पूनर्वसन) सालोड येथे पाणीटंचाई असून त्यांना आराखड्यात घेण्याच्या सूचना तहसीलदारांना केल्या. कारंजा तालुक्यातील खैरी (पूनर्वसन) येथील पाणी पाईपलाईनचे कामे पूर्ण करावे. शिरूड प्रकल्पाअंतर्गत कलम १३ (३) ची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला प्रकल्पांचा पुनर्वसन अहवाल व योजना तयार करून प्रस्ताव सादर करावा. नटाळा (पुनर्वसन), पिपरी (मेघे) येथील प्रकल्पग्रस्तांना स्मशानभूमी व नागरी सुविधा द्यावी, आदी सूचना यावेळी केल्या.(स्थानिक प्रतिनिधी)