१० महिन्यांत माळेगाव (ठेका)चे पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 10:25 PM2017-10-03T22:25:22+5:302017-10-03T22:25:31+5:30
पिढ्यानं पिढ्यांपासून वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने गरज असलेल्या माळेगाव (ठेका) गावाचे पुनर्वसन दहा महिन्यात होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : पिढ्यानं पिढ्यांपासून वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने गरज असलेल्या माळेगाव (ठेका) गावाचे पुनर्वसन दहा महिन्यात होणार आहे. त्यासाठी शासनाने समिती गठित केली असून समितीत गावकºयांचा एक प्रतिनिधी सुद्धा राहणार आहे. दहा महिन्यात गावाचे पुनर्वसन करण्यासंबंधी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाºयांना आदेश दिले आहे.
येथील सरपंच प्रभाकर घाटोळ यांच्या नेतृत्वात आशिष काकडे, राजू बैस, संतोष साहू, राजू धरवार, प्रमोद मेटकर, मोरू निकोडे, लक्ष्मण बावणकर, विशाल साहू यांनी चंद्रपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून निवेदन सादर केले. येथील सर्व शेती ही जंगलव्याप्त भागात आहे. वाघ, बिबट या हिंस्त्र प्राण्यांसह रोही, रानडुक्कर या वन्य श्वापदांचा येथे मुक्त वावर आहे. त्यामुळे येथील शेती बिनभरवशाची झाली आहे. पिढ्यानपिढ्या इथला शेतकरी संघर्षाचे जीवन जगत आहे. शेतीला गोपालन हा जोड धंदा असल्याने कशी बशी दोन वेळची चटणी भाकरी तरी खायला मिळते. निव्वळ शेतीवर अवलंबून असते तर उपाशीपोटी मरावे लागले असते.
येणीदोडका, गरमसूर या नावासोबत माळेगाव (ठेका) या गावाचे पुनर्वसन होण्याची अशा आता पल्लवीत झाली आहे. येथील रूग्णांना उपचारासाठी कारंजा, आर्वी, वर्धा, वा सेलूकडे जाणारे मार्ग जंगलातून जातात व दहा किमीत जंगल ओलांडूनच कोणत्याही दिशेला जावे लागते. इतकी बिकट स्थिती या गावाची झाली आहे. या सर्व बाबीबाबत वनमंत्र्यांना ग्रामस्थांनी अवगत केले आहे. गावाच्या पुनर्वसनाबाबत गठीत समिती शासनाला तसा अहवाल सादर करणार असल्याने पुनर्वसनाला मार्ग मोकळा होणार आहे.