व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:41 AM2017-12-23T00:41:12+5:302017-12-23T00:41:48+5:30
आर्वी विधानसभा क्षेत्रातील माळेगाव (ठेका), मरकसुर, मेटहिरजी, उमरविहरी, येणीदोडका आदी गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश करावा.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : आर्वी विधानसभा क्षेत्रातील माळेगाव (ठेका), मरकसुर, मेटहिरजी, उमरविहरी, येणीदोडका आदी गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश करावा. तसेच सदर गावांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार दादाराव केचे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या गावातील शेतकºयांना श्वापदांचा उपद्रव सहन करावा लागतो. त्यांना शेती करणे कठीण झाले आहे. परिसरातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. श्वापदांमुळे मात्र ग्रामस्थांना शेतात जाणे कठीण झाले आहे. व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावातील आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच अन्य महत्त्वाच्या कामासाठी ग्रामस्थांना कारंजा, आर्वी, वर्धा, सेलू येथे जावे लागते. येथे पोहचण्यासाठी जंगल परिसरातून जावे लागत असल्याने ग्रामस्थ धास्तावलेले असतात. जीव मुठीत घेऊनच ग्रामस्थ प्रवास करतात. या सर्व पाश्र्वभूमीवर येथील जनजीवन प्रभावित झाले आहे.त्यामुळे या गावांचे पुनर्वसन गरजेचे झाले आहे. येथील ग्रामस्थ दहशतीच्या वातावरणात जीवन जगत आहे.
या गावांचे पुनर्वसन जंगल परिक्षेत्राच्या बाहेर करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. दादाराव केचे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडलेल्या समस्येचे गांभिर्य लक्षात घेऊन त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सदर ग्राम्स्थांचे पुनर्वसन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.
निवेदन देताना राजू कदम, प्रशांत वानखेडे, शिरीष भांगे, मंगेश खवशी, अशोक विजेकर, हरीभाऊ जसुतकर, आश्विन शेंडे, धिरेंद्र शेंडे, निखिल कडु, रोशन पवार, दिनेश डेहनकर, जगदीश डोळे, सागर ठाकरे, अनिल लेंडे, विजय तभाने, उधाराम मंढाळे, पांडुरंग मडावी, सुखदेव उईके, मार्गेश्वर सलाम, सुधाकर वरटी, पुनिराम उईके, बालू शेंडे, किशोर पट्टे, किरण येडमे, नितेश शिरसाम, हरिदास भलावी, राधेश्याम अवथळे, नरेश डोळे, शेषराव सपकाळ, राजु सपकाळ, कृष्णा पेठकुले तसेच माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहरी, येनिदोडका व मरकसुर येथील ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.
शेती ठेवावी लागते पडीक
आर्वी तालुक्यातील काही गावे बोरधरण व्याघ्र प्रकल्पालगत आहे. त्यामुळे या गावात वन्यप्राण्यांचा हैदोस असतो. गावातील रहिवासी श्वापदांमुळे धास्तावलेले आहे. हा परिसर जंगलक्षेत्राने वेढलेला आहे. वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार असून रोही, रानडुक्कर हे प्राणी शेतात शिरून नासाडी करतात त्यामुळे शेतकरी बेजार झाला आहे.