पुनर्वसन; येणी दोडकावासीयांंचे ७ च्या आत घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 06:00 AM2020-01-01T06:00:00+5:302020-01-01T06:00:09+5:30
बोर व्याघ्र प्रकल्पात छोटे-मोठे असे एकूण सुमारे आठ वाघ असल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यांना बीटीआर-१, बीटीआर-२ असे नावही देण्यात आली आहेत. कॅटरीना व अंबिका या दोन वाघिणींनी वेळोवेळी दिलेल्या बछड्यांमुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येत बऱ्यापैकी वाढ झाली. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जमिनीत वाढ गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कारंजा तालुक्यातील काही शेतशिवारात सध्या बीटीआर-७ आणि बीटीआर-९ या वाघांचा वावर आहे. त्यांच्याकडून पाळीव प्राण्यांची शिकार केली जाते. शिवाय सदर वाघ मनुष्यावरही हल्ला करू पाहात असल्याने येणी दोडका परिसरातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. सदर गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येणी दोडकावासीयांना ७ च्या आत घरात यावे लागत आहे. ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पात छोटे-मोठे असे एकूण सुमारे आठ वाघ असल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यांना बीटीआर-१, बीटीआर-२ असे नावही देण्यात आली आहेत. कॅटरीना व अंबिका या दोन वाघिणींनी वेळोवेळी दिलेल्या बछड्यांमुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येत बऱ्यापैकी वाढ झाली. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जमिनीत वाढ गरजेचे आहे. मुक्तसंचारासाठी जागा कमी पडत असल्याने अनेकदा बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघ येणी दोडका शेत शिवारांपर्यंत येतात. अशातच ते वन्यप्राण्यांची शिकारही करतात. बहुतांशवेळा शेतात काम करणाºया मनुष्यावरही ते हल्ला चढवितात. त्यामुळे या भागातील नागरिकांना नेहमीच दहशतीत जीवन जगावे लागत आहे. इतकेच नव्हे, तर सध्या या परिसरात बीटीआर-७ आणि बीटीआर-९ या वाघांचा वावर असल्याने नागरिकही सायंकाळी काळोख पसरण्यापूर्वीच घर गाठतात. शिवाय रात्री घराबाहेर पडण्याचेही टाळतात. येणी दोडका हे गाव जंगलव्याप्त परिसरात असून या भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाची नासाडी वन्यप्राण्यांकडून केली जाते. नुकसानीपोटी वनविभागाकडून शासकीय मदत मिळत असली तरी ती झालेल्या नुकसानीच्या तुलनेत तो अल्प राहत असल्याने शेतकरीही मेटाकुटीस आला आहे. एखाद्यावेळी रात्रीच्या सुमारास गावातील कुणीची प्रकृती बिघडल्यास जीव धोक्यात टाकूनच रुग्णालय गाठावे लागते. नागरिकांची समस्या लक्षात घेता येणी दोडका या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आहे.
आवश्यक वस्तूंकरिता ओलांडावी लागते गावाची सीमा
गावात साधे जीवनावश्यक साहित्याचे दुकान नाही. चक्की नाही त्यामुळे मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी गावकºयांना गावाची सीमा ओलांडावी लागते. काहींनी रोजगार आणि शिक्षणासाठी गावही सोडले. हिच अवस्था व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेलगत असलेल्या गरमसूर, मरकसूर, मेठहिरजी आणि उमराविहिरी या गावांची आहे.