शेतकऱ्यांच्या तुरीला तहसीलदारांसमक्ष नकार
By admin | Published: April 10, 2017 01:26 AM2017-04-10T01:26:06+5:302017-04-10T01:26:06+5:30
शेतकऱ्यांच्या चांगल्या तुरीला नापास करून तीच तूर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नाफेडचे अधिकारी खरेदी कारीत
शेतकऱ्यांचा आरोप : आर्वी बाजारातील प्रकार
आर्वी : शेतकऱ्यांच्या चांगल्या तुरीला नापास करून तीच तूर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नाफेडचे अधिकारी खरेदी कारीत असल्याचा प्रकार येथील बाजार समितीत तहसीलदारांच्या समक्षच उघड झाला. या व्यवहारात व्यापारी व नाफेडच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कमाई होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर नाफेडची तूर खरेदी सुरू आहे. मार्केट यार्डवर आलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची तपासणी करण्याकरिता एनसीएमसी कंपनीचा तज्ज्ञाची नेमणूक केलेली आहे. नाफेडच्या निकषाप्रमाणे ३ टक्के पर्यंत खराब दाणे असलेली तूर खरेदी केल्या जावू शकते. याचा लाभ उचलत जो मलीदा देईल, त्याची तूर पास करण्याचा प्रकार येथे होत आहे. तर निकषात बसणारी तूर नापास करण्याचा प्रकार होत आहे. यामुळे निराश झालेला शेतकरी वाहतुकीचा खर्च झेपत नसल्याने तो मार्कट यार्डवरच व्यापाऱ्याला ३,५०० रुपयांत विकतो.
व्यापाऱ्याकडून तोच माल पुन्हा नाफेडचे कर्मचारी पास करून खरेदी करीत आहे. यात व्यापारी एका दिवसात सुमारे १,५०० रुपयांची कमाई बसल्या ठिकाणी करतो तर शेतकऱ्याला उत्पादनाला लागलेला पैसासुद्धा मिळत नसल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी काँग्रेसचे वर्धा जिल्हा लोकसभा मतदार संघाचे महासचिव सचिन वैद्य यांनी केला असून चौकशीची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोलवण्यावरुन पिंपरी पुनर्वसन येथील शेतकरी रज्जाक अली यांनी ६० क्विंटल तूर येथील मार्केट यार्डवर आणली. त्यांचा माल निकषपात्र असताना सुद्धा नाफेडच्या कर्मचाऱ्याने नापास केला. यामुळे सदर शेतकऱ्याने सचिन वैद्य यांच्या माध्यमातून येथील उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा यांच्याकडे याची तक्रार केली. परिणामी, त्यांनी तहसीलदार विजय पवार व तालुका कृषी अधिकारी पी.डी. गुल्हाणे यांना बाजारात पाठविले.
तहसीलदार विजय पवार यांनी नाफेडच्या कर्मचाऱ्याच्या हाताने रज्जाक अली यांच्या तुरीचा नमुना व यापूर्वी नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचा नमूना बोलविला. त्याचे परीक्षण त्यालाच करायला सांगितले. यात आधी खरेदी केलेल्या तुरीच्या नमुन्यात १.६२ टक्के खराब दाणे आढळून आले तर रज्जाक अली यांच्या तुरीच्या नमून्यात फक्त ०.५३ टक्केच खराब दाणे असल्याचे दिसून आले. येथेच नाफेड कर्मचाऱ्याची बदमाशी उघड झाली.