मृतदेहासह नातेवाईक पोहोचले महावितरणच्या कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 11:42 PM2018-05-05T23:42:14+5:302018-05-05T23:42:14+5:30
तालुक्यातील शिवणी येथील ट्रॅक्टर चालक रवींद्र प्रमोद काळे याला जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाला. यापासून बचावाकरिता त्याने ट्रॅक्टरवरून उडी घेतल्याने चालकाखाली येवून त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.४) रोजी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील शिवणी येथील ट्रॅक्टर चालक रवींद्र प्रमोद काळे याला जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाला. यापासून बचावाकरिता त्याने ट्रॅक्टरवरून उडी घेतल्याने चालकाखाली येवून त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.४) रोजी घडली. त्याच्या मृत्यूला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप करीत त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह शनिवारी थेट महावितरणच्या स्थानिक कार्यालयात नेत आंदोलन केले.
यावेळी मृतकाच्या नातेवाईकांकडून महावितरणच्या अभियंत्याला मोबदल्याची मागणी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान शवविच्छेदन अहवालाचा अभ्यास करून जर वीज वितरण कंपनीचा दोष असल्यास ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कार्यवाही करून योग्य मोबदला देवू असे आश्वासन उपकार्यकारी अभियंता प्रशांत उईके यांनी रवींद्र काळेच्या नातेवाईकांना दिले. आश्वासनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ठाणेदार प्रवीण मुंडे यांनी मंदा ठवरी यांना कलम १४९ भादंविनुसार नोटीस दिली असता त्यांनी तो घेण्यास नकार दिला. या आंदोलात साधारणत: तासभर रवींद्र काळेचा मृतदेह कार्यालयात ठेवून आश्वासनाअंती पोलीस बंदोबस्तात शिवणी येथे नेण्यात आला. यावेळी पीएसआय प्रवीण लिंगाडे, माधुरी गायकवाड, उमेश हरणखेडे, स्वप्नील वाटकर, चांगदेव बुरंगे, चाफले, आदी कर्मचारी उपस्थित होते.
मृतदेहासोबत धर्मेंद्र पवार, तुफान पवार, तुबाना पवार, राजमिला पवार, रेशमा पवार, ईशिना पवार, सुशिला पवार, मृतकाचे वडील प्रमोद काळे, पत्नीसह बऱ्याच नातेवाईक उपस्थित होते.
ट्रॅक्टर अपघात प्रकरण : चौकशीच्या आश्वासनावर प्रकरण निवळले
सदर इसमाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला अथवा नाही या संदर्भात चौकशी सुरू आहे. या चौकशीत तसे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल. शवविच्छेदन अहवालानुसार नियमाप्रमाणे मृतकाच्या वारसानास मोबदला देण्यात येईल
- प्रशांत उईके, उपकार्यकारी अभियंता, म.रा.वि.कं. समुद्रपूर