धर्म हा कर्मकांडासाठी नसून मानव कल्याणासाठी
By Admin | Published: January 15, 2017 12:48 AM2017-01-15T00:48:48+5:302017-01-15T00:48:48+5:30
माणूस पृथ्वीवर सर्व प्राण्यांच्या नंतर जन्माला आला. तेव्हा, त्याला जगण्याचा, चांगला वागण्याचा हक्क व अधिकार निसर्गदत्तच मिळाले.
शेख हाशम : लोकतंत्र व मानवाधिकार विषयावर व्याख्यान
वर्धा : माणूस पृथ्वीवर सर्व प्राण्यांच्या नंतर जन्माला आला. तेव्हा, त्याला जगण्याचा, चांगला वागण्याचा हक्क व अधिकार निसर्गदत्तच मिळाले. कालांतराने माणसाने कसं जगावं, जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे नियम म्हणजे धर्म होय. ते सामाजिकतेला जवळ करणारे आहे. सामाजिकतेचा आशय महत्त्वाचा आहे. समाज जीवनात येणारे संघर्ष टाळण्यासाठी नियम असतात. त्याचेच रूपांतर म्हणजे धर्म होय. धर्म हा कर्मकांडासाठी नसून तो मानव कल्याणासाठी आहे, असे मत राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक व माजी अधिव्याख्यायते प्रा. शेख हाशम यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अनेकांत स्वाध्याय मंदिर, राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विविध पुरोगामी संस्था व संघटना समन्वय समिती, वर्धा यांच्या सहकार्याने अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येतो. २३ व्या अभ्यासवर्गात लोकतंत्र व मानवाधिकार या विषयावर झालेल्या व्याख्यानात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणू प्रा. शेख हाशम बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र अंनिसचे राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, अनेकांत स्वाध्याय मंदिरचे ट्रस्टी अरूण चवडे, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंडे, विठ्ठल गुल्हाणे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. हाशम शेख म्हणाले, मानवाधिकारात माणसाला सहज, सुरक्षित घटक उपयोगी ठरतील. स्वातंत्र्य म्हणजे त्याच्या गुणाचा विकास. व्यक्तीत्व स्वातंत्र्यातून अधिकाराची अभिव्यक्ती होते. माणसाला विकासासाठी प्रोत्साहित करते. हेच मानवाधिकाराचे महत्वाचे मुल्य आहे. मानवी अधिकार अविभाज्य घटक आहे. मानवधिकाराचा उदय जन्मताच निसर्गदत्त असला तरी त्याचा उदय इ.स. ५०० ते ५३९ पार्शियाचा राजा सायरस यांच्या काळात झाला.
सायरसने बाबोलियन राज्य लुटल्यानंतर गुलामांना स्वातंत्र्य देऊन त्यांना समुहासोबत, कुटुंबासोबत राहण्याची मुभा दिली. ते इच्छेनुसार कोणताही अस्तित्वात असलेला धर्म स्वीकारू शकतात. पुढे मॅग्नाकार्टा याने इ.स. १२०० तर ग्रेगचार्टर इ.स. १२१५ मध्ये मानवधिकाराचा आग्रह धरला. मानवाधिकाराचे लिखाण पुर्वी मातीच्या राजणावर लिहल्या गेले. ही बाब या दोघांनी निदर्शनास आणून दिल्यावर त्याला अमेरिकन सायरस सिलेंडर असेही म्हटल्या गेले.
आज मानवाधिकाराचे सतत उल्लंघन होतांना दिसते. पोलिसांची मारहाण, कौटुंबिक हिंसा, लैंगिक अत्याचार, त्यांचे उत्पीडन, स्त्री-पुरूष भेट, आदिवासीवर होणारे अत्याचार, बालहक्क, श्रमिकांचे अधिकारी इत्यादीतून उल्लंघन होत आहे. त्यासाठी पुरूष प्रधान मानसिकता बदलणे गरजेचे आहे. सोबतच प्रत्येकाने राज्यघटनेने दिलेले कर्तव्याचे पालन करणे, कर भरणे, धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचे पालन करणे प्रत्येकाच्या धार्मिक कार्यात उपस्थित राहणे, किमान ५ धर्माच्या व्यक्तींसोबत मित्रता वाढविणे. अनाठायी खर्चावर अंकुश आणने, यामुळे लोकतंत्र जिवंत राहून मानवधिकाराचे होणारे उल्लंघन थांबविता येईल, असे मत प्रा. हाशम यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र कांबळे यांनी केले. प्रास्ताविक सुनील सावध यांनी तर अतिथी परिचय अॅड. पुजा जाधव यांनी करुन दिला. आभार भास्कर नेवारे यांनी मानले.
कार्यक्रमाला अनिल मुरडीव सुधाकर मिसाळ, मयूर डफळे, डॉ. चेतना सवाई, सुनील ढाले, सुनील बोरकर, प्रकाश कांबळे यांनी सहकार्य केले. व्याख्यानाला शहरातील गणमान्य व्यक्ती तसेच नागरिकांची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)