जलयुक्त शिवारातून कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा
By admin | Published: September 16, 2015 02:54 AM2015-09-16T02:54:18+5:302015-09-16T02:54:18+5:30
स्थानिक मंडळ कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत २०१४-१५ मध्ये वासी, कोरा, खापरी, गांगापूर, पिंपरी, गिरड, साखरा, ...
२५८० टीसीएम पाणीसाठा शक्य : तीन योजनांच्या माध्यमातून करण्यात आली कामे
गिरड : स्थानिक मंडळ कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत २०१४-१५ मध्ये वासी, कोरा, खापरी, गांगापूर, पिंपरी, गिरड, साखरा, केसलापूर, रासा, मोहगाव तावी, शिवणफळ, उंदीरगाव, फरीदपूर, सावरी, चोरविहिरी आदी शेतशिवारात विविध योजनांतून मृद व जलसंधारणाची कामे करण्यात आली. यात १ हजार ५०० हेक्टरवर ढाळीचे बांध, अकरा शेततळे, १ हजार ७०० मिटर नाला खोलीकरण, चार सिमेंट नाला बांध तसेच महात्मा फुले तुट-फूट दुरूस्ती अंतर्गत १३ सिमेंट नाला बांधाची दुरूस्ती करण्यात आली. या कामांमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कृषी विभागाने केलेल्या या कामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे. ढाळीच्या बांधामुळे ६७५ टीसीएम, शेततळ्यांमुळे २५ टीसीएम तर नाला खोलीकरण १२० टीसीएम व सिमेंट नाला बांधामुळे ४० टीसीएम असा एकूण १६० टीसीएम साठा एकावेळी होतो. एका हंगामात सदर पाणीसाठा तीनवेळा निर्माल्य होत असल्याने एकूण २ हजार ५८० टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. सदर मृद व जलसंधारण कामांमुळे परिसरातील विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सिंचन क्षेत्रात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. पावसामध्ये खंड पडल्यास मृद व जलसंधाण कामांमुळे पिकांची वाढ होऊन उत्पादनही वाढणार आहे.
नाला खोलीकरण, शेततळे व सिमेंट नाला बांधामुळे पाणीसाठा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना ओलिताची सोय झाली आहे. सदर कामे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, जलयुक्त शिवार अभियान, कोरडवाहू शेती अभियान, क्षतिग्रस्त पाणलोट विकास कार्यक्रम आदींतून करण्यात आली. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ही कामे शेत परिस्थितीनुसार केल्याने याचा लाभ दीर्घकाळ होणार आहे.
जलशिवार बांधाचे उद्घाटन आ. समीर कुणावार, पं.स. सदस्य छाया निमजे, जि.प. सदस्य मंदा चौधरी, मोहन गिरडे यांच्या हस्ते झाले. मान्यवरांनी या कामांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असून पुढेही ही कामे मोठ्या प्रमाणावर केले जातील व शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, असे सांगितले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक उपस्थित होते.(वार्ताहर)