पालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली काढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:59 PM2018-01-06T23:59:57+5:302018-01-07T00:00:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : नगर पालिकेत २२६ रोजंदारी कर्मचारी जे १९८२ पासून सेवेत आहेत त्यांना सेवेत कायम करण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालून त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडून निकाली काढू असे आश्वासन वर्धा जिल्हा नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला आ. समीर कुणावार यांनी दिले.
यावेळी त्यांनी सेवेत कायम होईपर्यंत सध्या असलेल्या ४३० रूपये रोज किमान वेतनाप्रमाणे १ जानेवारी २०१७ पासून ५४८ रूपये करण्याबाबत नगराध्यक्ष, हिंगणघाट यांना सुचित करून वाढीव वेतन मिळवून देऊ असे आश्वासनही कर्मचारी संघटनेच्या शिष्ट मंडळास दिले. याप्रसंगी वर्धेचे नगरसेवक यशवंत झाडे यांनी आ. समीर कुणावार यांचा सत्कार केला.
सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स सिटू अंतर्गत कार्यरत वर्धा जिल्हा नगर पालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने ४ जानेवारी २०१८ रोजी धरणे आंदोलन हिंगणघाट नगर पालिकेसमोर सकाळी १० ते ४ या वेळेत करण्यात आले. वाढीव मजूरी प्रती दिन ५४८ रूपये द्या, १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत प्रती दिवस ११८ रूपये वाढीव मजुरीचा एरीयस द्या, न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ज्यांचे निकाल लागले त्यांना सर्वप्रथम सेवेत कायम करा, रोजंदारी कर्मचाºयांची सेवानिवृत्ती वय ६० वर्षे करा, सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना २४ आॅगस्ट २०१७ चे मुख्यमंत्री महोदयांचे निर्देशाप्रमाणे सेवेत कायम करावे, आदी मागण्यांसाठी आंदोलन केले. याप्रसंगी झालेल्या सभेत युनियनचे अध्यक्ष यशवंत झाडे, चंद्रभान नाखले, सिताराम लोहकरे, भैय्या देशकर यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर सुनील घिमे, संजय भगत, राहुल खंडाळकर यांची उपस्थिती होती. यावेळी मागण्यांचे निवेदन हिंगणघाट नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल जगताप, नगराध्यक्ष पे्रम बसंतानी यांना देण्यात आले. शिष्टमंडळात यशवंत झाडे, सिताराम लोहकरे, भैय्या देशकर, अनिल झाडे, गर्वदास वासेकर, पुरूषोत्तम पार्लेवार, लिला चव्हाण, चंपा सौदे, चंपा तांबे यांचा समावेश होता. त्यानंतर या शिष्ट मंडळाने आ. समीर कुणावार यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदन देताना झालेल्या चर्चेअंती आमदार समीर कुणावार यांनी पालिकेतील कर्मचाºयांंच्या समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू व सदर मागण्या पूर्णत्वास जाईपर्यंत पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी मोठ्या संख्येने नगर पालिकेतील कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.