उपजिल्हा रूग्णालयातील समस्या निघाल्या निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:00 AM2018-07-11T00:00:16+5:302018-07-11T00:01:38+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंगणघाट येथील उपजिल्हा रूग्णालयातील समस्येबाबत १५ दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यानंतर आता रूग्णालयात अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. मंगळवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी रूग्णालयाची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंगणघाट येथील उपजिल्हा रूग्णालयातील समस्येबाबत १५ दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यानंतर आता रूग्णालयात अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. मंगळवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी रूग्णालयाची पाहणी केली. त्यामुळे आता मनसेने आंदोलन स्थगित केले आहे.
उपजिल्हा रुग्णालयात होणाऱ्या अनेक गैरसोयीबाबत, तसेच रुग्णालयातील रुग्णांना सहन कराव्या लागणाºया नाहक त्रासाबाबत ११ जून रोजी मनसेने रूग्णालयावर धडक देवून वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर चिंचलकर यांना निवेदन दिले होते. त्यानंतर पूर्वी रुग्णांना क्ष-किरणचा अहवाल दोन दिवसानंतर दिला जायचा. त्यात सुधारणा झाली आहे. तो आता दोन तासात दिला जात आहे. तसेच रक्तासाठी अतिरिक्त शुल्क घेणे ही थांबविण्यात आले आहे.
रुग्णांना जेवण पूर्णपणे देण्यात येत आहे. याशिवाय रुग्णालयात गैरहजर असणारे मलेरिया, टीबी, हत्तीरोग, नेत्र तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ नियमितपणे सेवा देत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याची आर ओ मशिन सुरु करण्यात आली आहे. रुग्णास बीपी व शुगरच्या गोळ्या १५ पंधरा दिवसाच्या दिल्या जात आहे. रुग्णालयात पूर्वी एकच परिचारिका तीन तीन वॉर्ड सांभाळत होती. आता परिचारिकांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. या साऱ्या बाबी मनसेच्या आंदोलनानंतर मार्गी लागल्या. त्यामुळे रूग्णांनी मनसेचे कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले असून उर्वरित समस्या लवकरच युद्धपातळीवर सोडविल्या जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे मनसेने आंदोलन स्थगित केले आहे.
वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने उपजिल्हा रूग्णालयाला भेट दिली त्यावेळी डॉ. किशोर चिंचलकर यांच्या चर्चा केली. त्यांनी रूग्णालय प्रशासनाने समस्या सोडविण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचे सांगितले. तसेच रूग्णालयाच्या साफसफाईबाबत आश्वासन दिले. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.