सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:36 AM2017-07-20T00:36:58+5:302017-07-20T00:36:58+5:30
नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार सुधारित किमान वेतन देण्यात यावे,
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : न.प. कर्मचारी संघटनेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार सुधारित किमान वेतन देण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन वर्धा जिल्हा नगर पालिका कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वात हिंगणघाट न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
रोजंदारीवरील सफाई कर्मचाऱ्यांना कामगार आयुक्त मुंबई यांचे पत्रानुसार ५४८ रूपये प्रतिदिवसाप्रमाणे वेतन देण्यात यावे. तसेच त्यांच्या वेतनात नियमानुसार वाढ करण्यात आलेली नसून ती करण्यात यावी. उच्च, सर्वोच्च सहीत अन्य न्यायालयाद्वारे प्राप्त झालेल्या समस्त न्यायप्रविष्ट कामगारांना त्वरित सेवेत सामावून घ्यावे. स्थानिक नगर परिषदेत १० मार्च १९९३ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना वयाची ६० वर्षेपर्यंत सेवा तर नंतरच्या कर्मचाऱ्यांना वयाची ५५ वर्षापर्यंतची सेवा देण्याचे सूचविण्यात आले आहे. हा प्रकार महाराष्ट्रातील कुठल्याही न.प. मध्ये अस्तित्वात नाही. नगर पालिकेत आवश्यक पदांवर काम करणाऱ्या स्थायी कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने न. प. ची संपूर्ण कामकाजाची जबाबदारी रोजंदारी कर्मचारीच पार पाडीत आहे. अश्या स्थितीत सदर अट कामगारांसाठी अन्याय असून सर्वांना समान संधी प्रदान करावी. समस्त रोजंदारी कर्मचाऱ्यांना जिथे कार्यरत आहेत त्या ठिकाणी शासनाची पदभरतीची मंजुरी मागवून सेवेत कायम करावे. अथवा ५ जुलै २०१६ च्या शासकीय ठरावानुसार नगर परिषदेतील कार्यरत कर्मचाऱ्यांना समायोजनाद्वारे न. पं. त कायम करण्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मागण्यांवर येत्या पंधरा दिवसाचे आत सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना गर्वदास वासेकर, रऊफ खान अजीज खान, खुशाल बावणे, चंपा सौदे, लीला चव्हाण, सुरेश गायकवाड, जाकीर हुसेन गुलाम अब्बास, संजय दुबे, दत्तु भजभुजे, गजानन चिरडे आदींची उपस्थिती होती.