भाषा विषय शिक्षकांवरील अन्याय दूर करा
By admin | Published: April 13, 2017 01:35 AM2017-04-13T01:35:36+5:302017-04-13T01:35:36+5:30
शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या, केंद्रप्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती, विषय शिक्षक (गणित/विज्ञान)
मागणी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
वर्धा : शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या, केंद्रप्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती, विषय शिक्षक (गणित/विज्ञान) नियुक्ती व ३० सप्टेंबर २०१६ चे पटसंख्येवर आधारित अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन हे सर्व मे २०१७ च्या होणाऱ्या बदल्यांपूर्वी करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने निवेदनातून केली. या मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, शिक्षणाधिकारी किसन शेंडे यांना देण्यात आले.
यानंतर शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. यात विषय शिक्षकांच्या रिक्त जागांवर गणित/विज्ञान करीता बी.एससी. किंवा १२ वी सायन्स शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जाईल. असे करताना कार्यरत भाषा व समाजशास्त्र विषय शिक्षकांवर अन्याय होणार नाही. त्यांची नियुक्ती रद्द किंवा बदली केली जाणार नाही, त्यांना अभय दिले जाईल, असे आश्वासन शिक्षणाधिकारी शेंडे यांनी दिले.
या चर्चेदरम्यान जुलै २०१४ मध्ये विषय शिक्षक नियुक्तीच्यावेळी जि.प. तत्कालीन शिक्षण विभाग प्रशासनाने विषय शिक्षकाच्या जिल्ह्यातील सर्व रिक्त जागांमधून समुपदेशनाने मागणीची संधी दिली नाही. तालुक्यातीलच जागा घेण्याची सक्ती केली गेली. परिणामी बऱ्याच पात्र बी.एस.सी. शिक्षकांनी सदर नियुक्ती नाकारली. त्यामुळे त्यांच्यावर त्यावेळी अन्याय झाला. ज्यांनी नियुक्ती स्वीकारली त्यांच्या आदेशात विषयाचा घोळ करून ठेवला. त्यामुळे आज काही शाळांमध्ये एकाच विषयाचे दोन-तीन शिक्षक कार्यरत आहे. ही अनियमितता दुरूस्त करावी, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली. जिल्हास्तरावरून अवघड क्षेत्रातील ज्या १२० शाळांची प्रथम यादी जाहीर केली त्यामध्ये समुद्रपूर व हिंगणघाट पं.स. मधील अवघड क्षेत्रात बसणारे बरेचसे गावे सोडण्यात आले आहे. त्यावर गावानिशी संघटनेने आक्षेप घेतला. बदली प्रक्रियेबाबत अवगत केल्याने त्यातील क्लिष्ट मुद्दे स्पष्ट होऊन शिक्षकांमधील संभ्रम दूर होईल, अनियमितता टाळण्यास मदत होईल यासाठी दि. १७ एप्रिल नंतर सहविचार सभा घेण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी शेंडे यांनी सांगितले. यावेळी राजेश वालोकर, सुनील कोल्हे, चंद्रशेखर वैद्य, प्रभाकर तुरक आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
चर्चेतून तोडगा काढण्याचे आश्वासन
शासन निर्णय २७ फेब्रुवारी २०१७ नुसार होणाऱ्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत सार्वत्रिक बदल्यांच्या प्रक्रियेबाबत तसेच अवघड व सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांच्या प्रसिद्ध होणाऱ्या यादीबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत शिक्षक संघटनांची सहविचार सभा घेण्यात यावी. बदली पात्रतेसाठी अवघड क्षेत्रात तीन वर्ष व सर्वसाधारण क्षेत्रातील १० वर्ष सलग सेवा ग्राह्य धरण्यात येईल. त्याकरिता एकूण सेवेचा तपशील भरून देणे बंधनकारक आहे. बदली पात्र शिक्षकांची यादी जाहीर झाल्यानंतर पात्र व ऐच्छिकांना बदली अर्ज करावे आदी मागण्या यावेळी केल्या.