गिरणी कामगारांच्या समस्या निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 09:58 PM2018-03-17T21:58:39+5:302018-03-17T21:58:39+5:30
पुलगाव येथील कापड गिरणी कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नियमित वेतन नाही. नियमित कर्तव्यावर ठेवले जात नाही. यामुळे कागमार त्रस्त असून या प्रलंबित मागण्या त्वरित निकाली काढाव्या, अशी मागणी प्रहारने केली आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : पुलगाव येथील कापड गिरणी कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नियमित वेतन नाही. नियमित कर्तव्यावर ठेवले जात नाही. यामुळे कागमार त्रस्त असून या प्रलंबित मागण्या त्वरित निकाली काढाव्या, अशी मागणी प्रहारने केली आहे. याबाबत गिरणी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
पुलगाव कॉटन मिल नावाने प्रसिद्ध असलेला कापड उद्योग सध्या खासगीरित्या चालविला जात आहे. यात मात्र कामगारांची पिळवणूक होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे कामगार अडचणीत आले आहेत. नियमित वेतन मिळत नसल्याने आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे गिरणीमध्ये स्थानिक कामगारांना प्राधान्य देण्यात यावे. किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना वेतन देण्यात यावे. कामगारांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत द्यावे, कामगारांना आरोग्य विषयक सुविधा देण्यात याव्या. कामगारांना घरभाडे भत्ता द्यावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्या निकाली काढण्यात याव्या, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गिरणी प्रशासनाला निवेदन देताना प्रहार कामगार संघटनेचे अध्यक्ष जुबेर अहमद, सचिव शेख जाफर, अमित शेळके, वैभव धांदे, सतीश, अमित जामकुटे, भरत मुंजेवार, शहर प्रमुख तुषार कोंडे, तुषार वाघ, महेश शाहू आदी उपस्थित होते.