तळेगाव-पुलगाव मार्ग शहराबाहेरून काढा
By admin | Published: June 15, 2017 12:50 AM2017-06-15T00:50:17+5:302017-06-15T00:50:17+5:30
शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा तळेगाव-पुलगाव मार्ग शहराच्या बाहेरून काढावा. अतिक्रमण हटाव मोहिमेत व्यापारी
अमर काळे : अतिक्रमणात व्यापाऱ्यांवर होणारा अतिरेक थांबवा
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा तळेगाव-पुलगाव मार्ग शहराच्या बाहेरून काढावा. अतिक्रमण हटाव मोहिमेत व्यापारी व नागरिकांवर करण्यात येत असलेली अतिरेकी कारवाई थांबवावी, अशी मागणी आ. अमर काळे यांनी केली. याबाबत मंगळवारी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.
शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या तळेगाव-पुलगाव राज्यमार्गाचे विस्तारीकरण काम सुरू करण्याकरिता नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व उपविभागीय अधिकारी यांनी सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत अनेक दुकांनाची तोडफोड करण्यात आली. नागरिकांच्या दारांसमोर खड्डे खोदून त्यांच्या जाण्या-येण्याचा मार्ग बंद करण्यात आला. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय अनेकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर नागरिकांच्या सोयीकरिता ३० लाख रुपये खर्चून बांधकाम विभागानेच बांधलेल्या भूमिगत नालीवरील स्लॅब तोडून व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर सहा फुट खोल खड्डा पाडला. यात पावसाळ्यात पाणी साचून होणाऱ्या घाणीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सोयीकरता माजी आमदार डॉ. शरद काळे यांच्या निधीतून सुमारे दोन लाख रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला प्रवासी निवारा अकारणत पाडण्यात आला. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून उन्ह, पावसाचा सामना करावा लागत आहे.
तळेगाव-पुलगाव राज्य मार्गा मध्यवस्तीतून गेल्यास शहराचे दोन भागात विभाजन होणार आहे. याचा दुष्परिणाम शहरातील जनजीवनावर होणार आहे. या मार्गावर शासकीय कार्यालये, न्यायालय, शाळा आदी असल्याने हा मार्ग नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचा ठरणार आहे. रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातात जीव गमवावा लागणार आहे. शहरातील मुख्य बाजारपेठही याच मार्गावर असल्याने व्यवसाय मोडकळीस येणार असून शेकडो तरूणांचा रोजगार हिरावला जाणार आहे. शहरातील मुख्य मार्गाच्या सौंदर्यीकरणाला विरोध नाही, तो व्हावा; पण तळेगाव-पुलगाव महामार्ग शहराच्या बाहेरून काढावा, नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या मध्यवस्तीत अतिक्रमण काढण्यापूर्वी दुकानदारांना व नागरिकांना त्यांच्या जागा आखून देत पूर्वसूचना द्यावी. नंतरच कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देताना निरज बेलवे, हरेश रावलानी, अनिल जैन, अनंत पांडे, विजय झेंडे, शे. मोहम्मद शे. रमजान, नितीन चिमोटे, अनिल राठी, करण मोटवाणी, कटियारी, आबीद अली इमदाद अली आदी उपस्थित होते.