‘डेंग्यू’ काढतोय डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 10:19 PM2018-08-02T22:19:12+5:302018-08-02T22:19:35+5:30

पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीत झपाट्याने वाढ होते. त्यामुळे कीटकजन्य आजारांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. यंदाच्या वर्षी आरोग्य विभागाने जुलै अखेरपर्यंत डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झालेल्या ५७ रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले.

Removing 'dengue' on the head | ‘डेंग्यू’ काढतोय डोके वर

‘डेंग्यू’ काढतोय डोके वर

Next
ठळक मुद्देतीन रुग्ण आढळले : आरोग्य विभागाने घेतले ५७ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीत झपाट्याने वाढ होते. त्यामुळे कीटकजन्य आजारांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. यंदाच्या वर्षी आरोग्य विभागाने जुलै अखेरपर्यंत डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झालेल्या ५७ रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले. त्यापैकी तीन व्यक्तींना डेंग्यूची लागण झाल्याचे पुढे आले आहे. ते उपचार घेतल्याने सध्या बरे झाल्याचे सांगण्यात येत असून नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज आहे.
डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. तो किटकजन्य आजारात मोडत असून एडिस एजिप्टाय डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होतो. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाने वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळीच योग्य उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकत असला तरी रुग्णाने आपल्या आरोग्याची निगा घेताना थोडेजरी दुर्लक्ष केल्यास या आजारामुळे रुग्णाला आपला प्राणही गमवावा लागू शकत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे नागरिकांनी किटकजन्य आजार टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे गरजेचे आहे.
रक्तजल नमुना तपासण्याची सुविधा सेवाग्रामात
डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झालेल्या रुग्णाच्या रक्ताचे नमुने गोळा करून ते तपासणी करीता सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठविले जातात. हे रक्त नमूने जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात येत असून यंदा जुलै अखेरपर्यंत डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झालेल्या ५७ रुग्णांच्या रक्ताचे नमुने या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही रुग्ण सध्या बरी झाल्याचे सांगण्यात येते.
स्वच्छ पाण्यात वाढतो डेंग्यूचा डास
डेंग्यू या आजाराची लागण एडिस इजिप्टाय डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होते. या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असून डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यातच अंडी घालतो. डेंग्यूचा डास हा दिवसा चावणारा असल्यामुळे संपूर्ण अंग झाकेल असेच कपडे घातले पाहिजे. शिवाय या आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, असे तज्ज्ञ सांगतात.
मच्छरदाणीचा वापर ठरतो फायद्याचा
किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पावसाचे पाणी घराच्या आवारात साचू देऊ नये. शिवाय सांडपाणी वाहते करावे. तर वापरण्यासाठी साठविलेले पाणी नेहमी झाकून ठेवावे. इतकेच नव्हे तर आठवड्यातून एक दिवस घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करून कोरडा दिवस पाळावा. असे केल्यास किटकजन्य आजाराच्या प्रादुर्भावाला अटकाव घालता येतो.
तसेच नागरिकांनी झोपताना मच्छरदाणीचा वापर केल्यास ते फायद्याचे ठरत असल्याचे सांगण्यात आले. ताप आल्यास कुठलाही घरगुती उपाय न करता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे आहे.

गत तीन वर्षांच्या तुलनेत यंदा डेंग्यू आजाराला अटकाव करण्यात आरोग्य विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. यंदा जिल्ह्यात डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले असून वेळीच योग्य उपचार त्यांना मिळाल्याने ते बरे झाले आहेत. किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. शिवाय डेंग्यूची लक्षणे आढळल्यास रुग्णाने नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.
- अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

Web Title: Removing 'dengue' on the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.