रामनगर लिज भूखंडांच्या नूतनीकरणात दिरंगाई
By admin | Published: July 18, 2016 12:36 AM2016-07-18T00:36:59+5:302016-07-18T00:36:59+5:30
नगर परिषदेच्या आदेशानुसार लिज धारकांनी जुलै २०१५ मध्ये लिज भूखंडांबाबत आवश्यक ती कागदपत्रे सादर केली.
नागरिकांचा आरोप : नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे
वर्धा : नगर परिषदेच्या आदेशानुसार लिज धारकांनी जुलै २०१५ मध्ये लिज भूखंडांबाबत आवश्यक ती कागदपत्रे सादर केली. सोबतच मूळ कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांनी तपासून घेत नागरिकांना परत केली. पालिकेने आता बुधवारी जाहिरात देत मूळ कागदपत्रे मागितली आहे. वास्तविक, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय सुस्पष्ट आहे. पालिका प्रशासनच दिरंगाई करीत असल्याने संबंधितांनी लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. याबाबत न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांनी त्री-सदस्यीय समितीद्वारे भाडे निर्धारण, समितीने लिजवर दिलेले भूखंड १९९१ ते २०२१ या कालावधीसाठी नूतनीकरण करणे याबाबत दिलेला निर्णय अगदी सुस्पष्ट आहे. यात पालिकेच्या जाहीर सूचनेत नमूद बाबीबद्दल कुठलाही उल्लेख नाही. नागरिकांनी संबंधित विभागाकडे लिज संदर्भातील सर्व कागदपत्रे देऊन ११ महिने लोटली आहे; पण अद्यापही पालिकेने नूतनीकरणाबाबत कार्यवाही केलेली नाही. शिवाय दिलेल्या वेळेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास नियमानुसार कार्यवाही करून सदर भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जाईल, असे धमकीवजा विधान केले आहे.
२२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सभेत लिज धारकांचे लोकप्रतिनिधी आ.डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी, नगर रचनाकार आणि न.प. मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या निर्णयानुसार पालिकेने कार्यवाही करणे गरजेचे होते. लिज धारकांना पालिकेत बोलविण्याऐवजी रामनगर येथील प्रमुख ठिकाणी अधिकारी पाठवून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून नूतनीकरण प्रकरणे त्वरित निकाली काढावी, अशी मागणी नगरसेवक संतोष ठाकूर यांच्यासह नागरिकांनी निवेदनातून केली. यावर मुख्याधिकाऱ्यांनी आवश्यक दस्तावेज सादर केल्यास नूतनीकरण करण्यात जाईल. आठवड्यातून दोन दिवस शुक्रवार व शनिवारी नागरिकांनी नगर परिषदेमध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्याला भेटावे आणि मूळ दस्तावेजांची तपासणी करून भूखंडांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे सांगितले. यामुळे लिजधारकांचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रामनगर लिजधारकांनी नगर परिषदेने जाहीर केलेल्या दिवशी भूखंडांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन संतोष ठाकूर यांनी केले आहे. निवेदन देताना वॉर्डातील केशव डाखोळे, डॉ. गोलावार, डॉ. भलमे, प्रा. देवतळे, विनोद देशमुख, दिनकर लोखंडे, पोराटे, मारोतराव राऊत, बोंडे, अनिल चाळके, नारायण चाळके, भांडवलकर, जडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)