सेवाग्रामात बापू दप्तरच्या नूतनीकरणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 06:00 AM2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:17+5:30
बापू कुटीच्या बाजूलाच आणि हाकेच्या अंतरावर बापूंचे दप्तर आहे. वास्तवात ही कुटी मीरा बहन यांनी स्वत:साठी बनविली होती. त्या तिथे राहून महिलांसाठी कार्य करीत असे. मात्र, फार काही राहण्याचे भाग्य त्यांना मिळाले नाही. बापूंचे कार्य वाढल्याने त्यांना स्वतंत्र कार्यालयाची गरज भासू लागली. एवढेच नव्हे, तर तत्कालीन व्हाईसराय यांना आणि अन्य लोकांना बापूंशी बोलता यावे यासाठी टेलिफोन लावण्यात आला, जो याच दप्तरमध्ये होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशातच नव्हे, तर जगात सेवाग्राम आश्रमातील बापू दप्तरचे महत्त्व कायम आहे. स्वातंत्र्य चळवळ आणि रचनात्मक कार्याला उभारी देण्याचे काम बापू दप्तरमधून होत होते. अशा महत्त्वाच्या आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या बापू दप्तरचे तब्बल ८२ वर्षांनी नूतनीकरणाचा योग आला आहे आणि प्रारंभसुद्धा झालेला आहे.
बापू कुटीच्या बाजूलाच आणि हाकेच्या अंतरावर बापूंचे दप्तर आहे. वास्तवात ही कुटी मीरा बहन यांनी स्वत:साठी बनविली होती. त्या तिथे राहून महिलांसाठी कार्य करीत असे. मात्र, फार काही राहण्याचे भाग्य त्यांना मिळाले नाही. बापूंचे कार्य वाढल्याने त्यांना स्वतंत्र कार्यालयाची गरज भासू लागली. एवढेच नव्हे, तर तत्कालीन व्हाईसराय यांना आणि अन्य लोकांना बापूंशी बोलता यावे यासाठी टेलिफोन लावण्यात आला, जो याच दप्तरमध्ये होता. या ठिकाणी बापूंचे सचिव महादेवभाई देसाई, प्यारेलालजी, किशोरभाई मश्रुवाला, राजकुमारी अमृताकौर आणि अन्य संबंधित बसून आपापली कामे करीत. हरिजन साप्ताहिकाचे कार्य याच दप्तरमधून चालत असे. बापूंच्या हाकेच्या अंतरावर असल्याने कामकाजाकरिता सुविधा झाली होती.
मीरा बहन यांनी अत्यंत साधी आणि अत्यल्प खर्चात झोपडी बनविली होती. विटा, बल्ली, फाटे, बांबू, बोरा, कमच्या यासह कुडसुध्दा कमच्याचे दिसून येत. बांबूच्या नी साध्या खिडक्या आहेत. एका श्रीमंत घरातील मुलगी मीरा बहन बनून अत्यंत साधे जीवन जगल्या, जे आश्रमासाठी आदर्श आणि बापूंच्या तत्त्वाशी सुसंगत होते.
तब्बल ८२ वर्षांनी नूतनीकरणाचा योग आला. नव्या बल्ली, फाटे, कमच्या, बोरा लावण्यात येणार असून लिपाई, जुडाई करण्यात येईल. पण यात जसेच्या तसेच असल्याने सावधगिरी बाळगत काम सुरू आहे. सध्या बल्ली गाडायचे काम सुरू झाले. टप्प्याटप्प्याटप्प्याने काम करण्यात येणार असल्याने बिघडण्याची शक्यता सुतराम नाही, हे मात्र खरे! आश्रम जगासाठी आदर्श आहे. अहिंसेच्या माध्यमातून ब्रिटिशांशी लढा उभारला. कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे काम आश्रमातून झाल्याने येथील प्रत्येक वास्तू आणि वस्तूचे महत्त्व अबाधित असणे आवश्यक आहे. हा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा असल्याने यांचे आयुष्य वाढणे आणि राखणे आवश्यक आहे. कामात व्यत्यय येऊ नये यासाठी हिरवी जाळी लावून ‘दर्शनार्थीयों के लिए बंद, प्रवेश निषिद्ध असे फलक लावल्याचे दिसून येत आहेत.