पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:19 PM2019-06-04T22:19:30+5:302019-06-04T22:20:02+5:30
शहरात भुयारी गटार योजनेंतर्गत मलवाहिनी टाकण्याकरिता सिमेंटचे रस्ते फोडण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने फोडलेल्या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी सिमेंटीकरण करावे, अशा सूचना नगरविकासच्या प्रधान सचिवांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात भुयारी गटार योजनेंतर्गत मलवाहिनी टाकण्याकरिता सिमेंटचे रस्ते फोडण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने फोडलेल्या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी सिमेंटीकरण करावे, अशा सूचना नगरविकासच्या प्रधान सचिवांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिल्या आहेत.
शासनाच्या अमृत योजनेंतर्गत वर्धा नगरपालिकेच्यावतीने भूमिगत पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. ही दोन्ही कामे सध्या रेंगोळलेली असून याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदार आपल्याच मनमर्जीने काम करीत असल्याने नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन या कामाची चौकशी करून कामाला गती देण्याची मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यावरून मुंबई येथे नगरविकासचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेत बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीला आमदार डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, नगर विकासचे सहसचिव पां. जो. जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सतीश सुशीर, अधीक्षक अभियंता एस. के. नंदनवार, वर्धा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे तसेच वर्धा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता वाघ यांची उपस्थिती होती.
तर नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करा
पाणीपुरवठा योजनेमध्ये सुमारे ४० कि.मी. वितरण व्यवस्थेचे काम हायड्रोलिक टेस्टिंगअभावी अपूर्ण आहे. त्याकरिता आवश्यक स्पेशल्स उपलब्ध झालेले नाहीत, अशी माहिती दिल्यानंतर नगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने यासंदर्भात बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे. ही कार्यवाही करणे शक्य नसल्यास सध्याच्या कंत्राटदाराच्या रिस्क अॅण्ड कॉस्टवर निर्णय घेऊन नवीन कंत्राटदाराकडून काम करण्यासंदर्भात जीवन प्राधिकरणने निर्णय घ्यावा. तो निर्णय पालिकेला कळवावा आणि पाणीपुरवठ्याचे सर्व काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना प्रधान सचिवांनी दिल्या.
कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका
सध्याच्या कंत्राटदाराने कामात चालढकल केल्यास नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करावी. त्यानंतर सध्याच्या कंत्राटदाराला संपूर्ण राज्यभरासाठी काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात पालिकेने कार्यवाही सुरू करावी. त्याचप्रमाणे संबंधित कंत्राटदार हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नोंदणीकृत कंत्राटदार असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेदेखील त्याला संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळ्या यादीत टाकावे, असेही सुचित करण्यात आले.
मलनिस्सारणे काम कालमर्यादेत व्हावे
भुयारी गटार योजनेचे काम मंदगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे मलवाहिनी टाकलेल्या रस्त्याचे तत्काळ सिमेंटीकरण करून ते काम जून अखेरपर्यंत शंभर टक्के पूर्ण करावे. तसेच ही योजना ३१ जुलैपर्यंत कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचनाही पालिका व जीवन प्राधिकरणने कंत्राटदाराला देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.