अतिक्रमणाची तक्रार करा अन् विसरा; चार महिन्यांत तक्रारी २१, धडक कारवाया केवळ १२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 05:00 AM2022-05-23T05:00:00+5:302022-05-23T05:00:06+5:30
शहरात हळूहळू का होईना पण पाय पसरविणारे हे अतिक्रमण एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारे असल्याने काही नागरिक थेट नगरपालिका प्रशासनाला याची तोंडी व लेखी माहिती देतात. त्यावर नगरपालिका प्रशासन धडक कारवाईही करीत असले तरी मागील चार महिन्यात केवळ शहरातील केवळ १२ परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आल्याचे वास्तव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुमारे दीड लाख लोकसंख्या असलेल्या वर्धा शहरातील प्रमुख मार्गांवर काही ठिकाणी छोट्या तर काही ठिकाणी मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने रस्तेच अरुंद झाले आहेत.
शहरात हळूहळू का होईना पण पाय पसरविणारे हे अतिक्रमण एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारे असल्याने काही नागरिक थेट नगरपालिका प्रशासनाला याची तोंडी व लेखी माहिती देतात. त्यावर नगरपालिका प्रशासन धडक कारवाईही करीत असले तरी मागील चार महिन्यात केवळ शहरातील केवळ १२ परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे मागील चार महिन्यांच्या काळात वर्धा नगरपालिका प्रशासनाला अतिक्रमणाबाबत २१ तक्रारी प्राप्त झाल्या असून उर्वरित अर्जांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वेळीच धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
१२ ठिकाणी कारवाया, नऊचे काय?
पालिका प्रशासनाने धडक मोहीम राबवून शहरातील १२ भागातील अतिक्रमण काढले असले तरी अजूनही अतिक्रमणाबाबतच्या नऊ तक्रारी प्रलंबित आहेत. अल्प मनुष्यबळ कारवाईला बहुदा ब्रेक लावते.
अतिक्रमण हटविण्यासाठी उसने कर्मचारी
वर्धा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहिमेचे नियोजन करताना आरोग्य, बांधकाम, मिळकतकर आदी विभागातून अधिकारी व कर्मचारी घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे.
तक्रार कशी व कुठे करायची?
अतिक्रमणाबाबत नगरपालिका प्रशासनाकडे थेट लेखी तक्रार करता येते. लेखी तक्रार ही मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने देणे क्रमप्राप्त असून तक्रार प्राप्त होताच शहानिशा करून कार्यवाही होते.
या भागातील अतिक्रमणाकडे लक्ष कोण देणार?
शहरातील रामनगर भागातील विविध परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.
शहरातील मुख्य मार्गावर अनेक मोठ्या व्यावसायिकांनी त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांसमोर टिनचे शेड उभारून अतिक्रमण केल्याचे बघावयास मिळते. शहराचे हृदयस्थान असलेल्या गोंड प्लॉट भागात काही ठिकाणी अतिक्रमण करण्यात आल्याने रस्तेच अरुंद झाले आहेत.
चार महिन्यांत अतिक्रमणाबाबत २१ तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने १२ ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आले. उर्वरित ठिकाणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण काढण्यात येणार आहे.
- निखिल लोहवे, सहा. व्यवस्थापक, मिळकत, न.प. वर्धा.
अतिक्रमणाबाबत चार महिन्यात २१ तक्रारी
- मागील चार महिन्यांच्या काळात वर्धा नगरपालिका प्रशासनाला अतिक्रमणाबाबत एकूण २१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
- अतिक्रमणाच्या तक्रारींची दखल घेत शहरातील १२ विविध भागांतील अतिक्रमण धडक मोहीम राबवून हटविण्यात आले असून यात आर्वी नाका परिसराचा समावेश आहे.