वर्धा जिल्ह्यात ‘टोल फ्री’ क्रमांकावर करा अवैध दारू विक्रीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 07:00 AM2021-06-03T07:00:00+5:302021-06-03T07:00:02+5:30
Wardha News वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी परिसरात होणाऱ्या अवैध भेसळयुक्त व बनावट दारू विक्रीची माहिती द्यावी म्हणून राज्यस्तरावर टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभाग दारूबंदीसाठी फ्रंटफूटवर आल्याचे दिसून येत आहे.
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महापुरुषांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तब्बल ४६ वर्षे उलटूनही ही दारूबंदी कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. नुकताच चंद्रपूर येथील दारूबंदी उठविण्याचा निर्णय झाला. याचे पडसाद वर्धा जिल्ह्यातही उमटले. या निर्णयाने वर्ध्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग सरसावला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी परिसरात होणाऱ्या अवैध भेसळयुक्त व बनावट दारू विक्रीची माहिती द्यावी म्हणून राज्यस्तरावर टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभाग दारूबंदीसाठी फ्रंटफूटवर आल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात दारूबंदी होऊन बराच काळ लोटला; पण आजही शहरासह जिल्ह्यात बिनधास्तपणे चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक केली जात आहे. अशातच संबंधित विभाग कुठलीही कारवाई करीत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात होता. जिल्ह्यात दारूबंदी असतानाही दररोज दारूची तस्करी होत आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ आदी लगतच्या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जिल्ह्यात दाखल होतो. दिवसाढवळ्या महागड्या कारमधून दारू शहरात आणली जाते. मात्र, याकडे कुणीही लक्ष देत नसून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. लॉकडाऊन काळात जिल्हा सीमा बंद ठेवण्यात आल्या असूनही कोट्यवधी रुपयांची दारू जिल्ह्यात दाखल झाली. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या सर्व गावांमध्ये आजघडीला खुलेआम दारूची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी याविरोधात आंदोलने केली, निवेदने दिलीत. पण दारूबंदी जिल्ह्यात अजूनही दारूची खुलेआम विक्री होते हे दुर्दैवीच म्हणावे लागेल.
खुलेआम दारू विक्रीविरोधात तक्रारी करण्यात येतात. कारवाईदेखील होते. पण, दारू विक्रेता पुन्हा जामिनावर सुटून आपला व्यवसाय बिनधास्तपणे सुरू ठेवतो. चंद्रपूर येथील दारूबंदी उठविण्याचा निर्णय होताच वर्धा जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली. परिसरात होणाऱ्या अवैध, भेसळयुक्त, बनावट दारू विक्रीची माहिती देण्यासाठी आता नागरिक ऑनलाईन तक्रार नोंदवू शकणार आहेत. इतकेच नव्हे तर राज्यस्तरावरील १८००८३३३३३३ हा टाेल फ्री क्रमांक तसेच ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तसेच राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन विभाग अधीक्षक सागर धामोरकर यांनी केले आहे.
बनावट दारूची राजरोस विक्री
दारूबंदी असल्याने मोठ्या प्रमाणात बनावट दारूही विकली जाते. रिबॉटलिंगचा धंदाही जोमात सुरू आहे. अर्धी विदेशी आणि अर्धी देशी दारू भरुन एक दारूची बाटली तयार करण्यात येते. त्या दारूला ‘चिपर’ असे म्हणतात. या दारुची पेटी ११०० ते १५०० रुपयांपर्यंत मिळते. वर्ध्यातील काही दारू विक्रेत्यांकडून पाच ते सहा हजार रुपयांपर्यंतच्या बनावट दारूची विक्री राजरोसपणे सुरू आहे.
पाच वर्षांत ४८ हजारांवर दारू विक्रेत्यांना अटक
शहरासह जिल्ह्यात खुलेआम दारू विक्री सुरू आहे. पोलिसांना दारू विक्री रोखण्यासोबतच गुन्हे नियंत्रणात ठेवण्याचीही जबाबदारी सांभाळावी लागते. २०१६ ते २०२० या पाच वर्षांत अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या ४८ हजार ५८० विक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली, तर ५९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे.
...............