पारसला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:50 PM2018-03-07T23:50:43+5:302018-03-07T23:50:43+5:30
चितोडा येथील पारस किसन मिना (३२) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सेवाग्राम पोेलिसांना पंचनामा करताना घटनास्थळावरून त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : चितोडा येथील पारस किसन मिना (३२) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सेवाग्राम पोेलिसांना पंचनामा करताना घटनास्थळावरून त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप केला होता; पण सेवाग्राम पोलीस संथगतीने कारवाई करीत असल्याने पारसला आत्महत्येस प्रवृत्त करणाºयांवर गुन्हा दाखल करावा, ही मागणी करीत पारसच्या कुटुंबियांसह नागरिकांनी बुधवारी सेवाग्राम पोलीस ठाण्यात धडक दिली.
चितोडा येथील रेल्वे वसाहत परिसरातील पारस मिना हा रेल्वे विभागात कार्यरत होता. तो होळीनिमित्त सुट्टीवर गेला होता. सुट्ट्यांचा कालावधी संपल्यानंतर तो कर्तव्यावर रूजू होण्यासाठी रेल्वे विभागाच्या कार्यालयात गेला; पण तेथील काही अधिकाºयांनी त्याला कर्तव्यावर रूजू करून घेतले नाही. हा प्रकार सतत दोन ते तीन दिवस त्याच्याशी काही अधिकाऱ्यांनी केला. रेल्वे अधिकाºयांच्या जाचाला कंटाळून अखेर पारसने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी एक चिठ्ठीही लिहून ठेवली. यामुळे संबंधित रेल्वे अधिकाºयांवर त्वरित आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करीत कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृतक पारसच्या कुटुंबियांसह त्याच्या निकटवर्तीयांनी केली आहे.
यासाठी संतप्त कुटुंबीय व चितोडा येथील नागरिकांनी बुधवारी सेवाग्राम पोलीस ठाण्यात धडक देत निवेदन सादर केले. यावेळी जि.प. सदस्य पंकज सायंकार, विनोद पवार, यादवराव नाखले, सुधाकर रांधळे, अविनाश भोवते, बंडू भोयर, अब्दुल सादीक, पूजा मुते, शुभांगी वाघमारे आदी उपस्थित होते.
गुन्हे दाखल न केल्यास तीव्र आंदोलन
मृतक पारसने आत्महत्या करण्यापूर्वी कुणाच्या जाचाला कंटाळून असा कठोर निर्णय घेत आहे हे स्पष्ट होईल, अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती पंचनामा करताना सेवाग्राम पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेत दोषी असणाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी सदर प्रकरणाच्या तपासी अधिकाऱ्यांसह सेवाग्रामचे ठाणेदार व जिल्हा प्रशासनाची राहिल, असा इशारा जि.प. सदस्य पंकज सायंकार यांनी दिला आहे.