शिधापत्रिकांच्या नुतनीकरणास पाच वर्षांपासून बगल
By admin | Published: April 1, 2015 01:54 AM2015-04-01T01:54:26+5:302015-04-01T01:54:26+5:30
मागील पाच वर्षांत तहसील विभागांतर्गत असलेल्या सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत शिधापत्रिका नुतनीकरणासाठी फॉर्म भरून घेण्यात आले; ...
खरांगणा (मो़) : मागील पाच वर्षांत तहसील विभागांतर्गत असलेल्या सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत शिधापत्रिका नुतनीकरणासाठी फॉर्म भरून घेण्यात आले; पण नवीन डिजीटल शिधापत्रिका सामान्यांच्या हाती पडल्या नाही़ यंदा तरी नुतनीकरण केलेले नवीन राशन कार्ड मिळेल काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत़
सन २००९-१० पासून तीन वेळा स्वस्त धान्य दुकानदारामार्फत पुरवठा विभागाने शिधापत्रिकेचे फॉर्म भरून घेतले. फॉर्म भरताना प्रत्येक वेळी दोन फोटो, घरकराची पावती, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्डची सत्यप्रत, बँक पासबुकची झेरॉक्स ही सर्व कागदपत्रे मागवून फॉर्म भरून घेतले; पण नवीन कार्ड हातात आले नाही़ आता पुन्हा कार्ड नुतनीकरण करण्यासाठी पुरवठा कार्यालयाकडून फॉर्म भरून घेण्याचे सोपस्कार पार पाडले जात आहेत़ स्वस्त धान्य दुकानदाराकडे ते फॉर्म सर्व प्रकारची आवश्यक कागदपत्रे लावून भरून देण्यास सांगण्यात आले आहे़ यामुळे नागरिक पुन्हा कामे सोडून कंट्रोल दुकानदाराच्या उंबरठ्यावर जाऊन बसत असल्याचे दिसते़ फॉर्म भरण्याच्या या प्रक्रियेचा जाहीरनामाही लावलेला नाही वा दवंडी देऊन नागरिकांना सूचनाही देण्यात आल्या नाही. अनेकांना याची कल्पना नाही. अनेक कुटुंब प्रमुख दुष्काळाच्या आजच्या परिस्थितीत गाव सोडून रोजी-रोटीकरिता बाहेरगावी गेले आहेत. यामुळे अनेक लाभार्थी नवीन राशनकार्डपासून वंचित राहू शकतात.
१५ वर्षांपूर्वी शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या होत्या़ त्यात केशरी, शुभ्र, पिवळी, अंतोदय, अन्नपुर्णा, असे पाच प्रकार अस्तित्वात होते़ यातील शुभ्र शिधापत्रिका उच्च उत्पन्न, केशरी सर्व साधारण (एपीएल) गटात, पिवळी दारिद्र्य रेषेखालील तर अंतोदय, अन्नपूर्णा या पत्रिका वृद्ध, भूमिहिन, अपंग व्यक्ती गटात मोडतात. यानुसार धान्य व जीनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात होते; पण सध्या एपीएलचे धान्य बंदच आहे़ यामुळे कार्ड नवीन करून काय साध्य करणार, हा प्रश्नच आहे़(वार्ताहर)