सेवाभावीनगरातील रहिवासी मुलभूत सुविधांपासून वंचित
By admin | Published: May 14, 2017 12:52 AM2017-05-14T00:52:14+5:302017-05-14T00:52:14+5:30
येथील सेवाभावीनगरातील रहिवासी मुलभूत सुविधापासून वंचित आहेत. त्यांना प्राथमिक सोई-सुविधा देण्याकडे ग्रा.पं. प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे.
ग्रा.पं. प्रशासनाचे दुर्लक्ष : प्राथमिक सोयी-सुविधांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : येथील सेवाभावीनगरातील रहिवासी मुलभूत सुविधापासून वंचित आहेत. त्यांना प्राथमिक सोई-सुविधा देण्याकडे ग्रा.पं. प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. या भागात अस्वच्छतेने कळस गाठला असून रस्त्यांचीही दैनावस्था झाली आहे. परिणामी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
खरांगणा (गोडे) मार्गावर सेवाभावीनगर आहे. या भागाचा झपाट्याने विस्तार होत असून जवळपास ३५० ते ४०० घरे या परिसरात आहे. या भागात राहणाऱ्यांमध्ये बहुतांश नोकरदार आहे. सदर परिसर कस्तुरबा रुग्णालयाच्या जवळ असल्याने तेथील कर्मचारीही येथे बऱ्यापैकी वास्तव्यास आहेत. नवीन ले-आऊटमुळे व बाजारपेठ जवळ पडत असल्याने या भागात निवासस्थाने वेगाने बनली. आधुनिक पध्दतीचीच घरे येथे आहेत. तर काही ठिकाणी तुरळ घरे आहेत. या भागातून स्थानिक ग्रा.पं.ला मोठ्या प्रमाणात कर प्राप्त होतो. परंतु, या भागातील रहिवाशांना पाहिजे त्या प्रमाणात सोई-सुविधा पुरविल्या जात नसल्याची परिसरात ओरड आहे.
या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बहुतांश घरी विहीर, कुंपनीका असली तरी अनेक विहिरी व बोरवेलने तळ गाठला आहे. या भागात काही ठिकाणी पक्क्या नाल्या असल्या तरी त्यांना उतार नसल्याने सांडपाणी वाहून जात नाही. बहुतांश भाग पक्क्या नालीच्या प्रतीक्षेत आहेत. नाल्यांच्या अवती-भवती मोठ्या प्रमाणात झुडपे वाडली असून त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. ठिकठिकाणी सांडपाणी साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शिवाय डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाने या भागातील रहिवाशांना प्राथमिक सोई-सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी आहे.
रस्त्याची दैना
या भागातील काही सिमेंट रस्ते ठिकठिकाणी खचले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. तर काही ठिकाणी गिट्टीची चुरी टाकण्यात आली आहे. पावसाळ्याच्या दिवसात या परिसरातील नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. परिसर पथदिवे लावण्याची मागणी असून याकडे ग्रा.पं. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रा.पं. ने पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. घरी विहीर आहे; पण ती कोरडी पडल्याने हॅन्डपंपवरून पाणी आणावे लागते. हॅन्डपंपचा प्लॅटफार्म सुध्दा फुटलेला आहे. त्यामुळे उभे राहणे कठीण होते.
- सुधाकर म्हसकर
नाल्यांची स्वच्छता केल्या जात नाही. सांडपाण्याच्या डबक्यात डास तयार होत असून आरोग्यावर परिणाम होत आहे.
- शोभा ठाकरे
अस्वच्छतेने कळस गाठला असून स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे. नाल्या बुजल्या आहे. वेळीच नादुरूस्त पथदिव्यांची दुरूस्ती होत नाही. त्यामुळे काळोखाचा सामना करावा लागतो.
- सोहालाल नखाते
नाल्यांचा उतार नाही. पाणी पुढे सरकत नसल्याने दुर्गंधीचा त्रास सहन सहन करावा लागतो.
- वासुदेव लोंगेकर