समान नागरी कायद्याचा विरोध
By admin | Published: December 29, 2016 12:44 AM2016-12-29T00:44:44+5:302016-12-29T00:44:44+5:30
केंद्र शासनाकडून देशात समान नागरिक कायदा लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पत्रपरिषदेत माहिती : शुक्रवारी ईदगाह मैदानातून मुस्लिमांचा मूकमोर्चा
वर्धा : केंद्र शासनाकडून देशात समान नागरिक कायदा लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून मुस्लीम समाजाच्या कायद्यावर गदा येणार आहे. ही बाब खपवून घेतली जाणार नाही. शरीयतमध्ये कायद्याचा हस्तक्षेप नकोच, अशी भूमिका मुस्लीम समाजाने घेतली आहे. याविरूद्ध वर्धा जिल्हा मुस्लीम कमिटीद्वारे शुक्रवारी मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
देशात समान नागरिक कायदा लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो लागू होऊ नये म्हणून मुस्लीम समाज एकवटला आहे. हा कायदा लागू झाल्यास शरीयतमध्ये हस्तक्षेप होईल आणि तो कदापिही मान्य नाही. या कायद्याचा विरोध करण्याकरिता वर्धा जिल्हा मुस्लीम कमिटीद्वारे शहरात शुक्रवारी मूकमोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. हा पहिला मोर्चा असल्याने केवळ पुरूष मंडळी सहभागी होणार आहे. मोर्चात सुमारे पाच ते सहा हजार मुस्लीम बांधव सहभागी होतील, असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. यासाठी सर्व मुस्लीम बांधव स्पयंस्फूर्तपणे सहभाग नोंदविणार आहे.
मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात येणार आहे. मूकमोर्चा शुक्रवारी दुपारी ३ वाजता महात्मा गांधी ग्राऊंड (ईदगाह मैदान) येथून निघणार आहे. बजाज चौक, बडे चौक, सीमा मेडिकल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
या मूकमोर्चामध्ये कुठल्याही प्रकारच्या राजकारणाचा शिरकाव नसल्याचे मूकमोर्चा समितीचे अध्यक्ष जुबेर शेख यांनी स्पष्ट केले. इस्लाम व शरीयतच्या संरक्षणाकरिता मुस्लीम समाज आंदोलन करीत आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अर्शी मलिक, अता उल्लाह पठाण, हाजी सोहराब तुरक, शेख अफसर, शेख सलीम, शेख नईम, बबलू शफी, शेख राजा, वसीम अली, शेख नवाब, मो. मुर्तूजा मंसुरी, हासीफ कुरेशी, शेख इमू, हाजी तौफीक नुराणी, हाजी अलताफ भाई, अकरम शेख, शेख जमील, शेख सादीक, शेख मुश्ताक कुरेशी, कलाम अंसारी, सैयद इरशाद यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)