४,७१५ व्यक्तींचा नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:41 AM2017-09-14T00:41:27+5:302017-09-14T00:41:45+5:30
नेत्रदान व अवयवदानासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. जनजागृती पंधरवाड्यादरम्यान नागरिकांना अवयवदान व नेत्रदानाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आल्याने ..
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नेत्रदान व अवयवदानासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. जनजागृती पंधरवाड्यादरम्यान नागरिकांना अवयवदान व नेत्रदानाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आल्याने जिल्ह्यातील ४ हजार ७१५ व्यक्तींनी नेत्रदानासह अवयवदानाचा संकल्प सोडला. सदर जनजागृती पंधरवाड्याच्या समारोपीय कार्यक्रमादरम्यान नेत्रदात्यांच्या कुटुंबियांसह दहा व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अवयवदान व नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे आठ व्यक्तींना जीवनदान मिळते. तसेच एका व्यक्तींच्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळत असल्याने सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुढाकाराने विविध सामाजिक संघटनांचे सहकार्य घेत प्रभावी कार्य केले जात आहे. यंदा २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान विविध ठिकाणी महत्त्व पटवून देण्यात आल्याने ४ हजार ६७८ व्यक्तींनी नेत्रदानाचा तर ३७ व्यक्तींनी अवयवदानाचा संकल्प फार्म भरून दिला आहे.
उल्लेखनिय म्हणजे यंदाच्या जनजागृती पंधवाड्यादरम्यान दोन व्यक्तींनी मरणोपरांत नेत्रदान केल्याने चार नेत्र बुबुळे संकलित झाले आहे. नेत्रदान व अवयवदान जनजागृती पंधरवाडा उपक्रमाचा समारोपीय कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांच्या अध्यक्षतेत पार पडला.
सदर कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, डॉ. मकरंदे, सक्षमचे सुधीर गंधे, डॉ. विनोद वाघमारे, भारती पुनसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमादरम्यान नेत्रदात्यांच्या कुटुंबियांसह उल्लेखनिय कार्य करणाºया एकूण दहा जणांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हिंगणघाट पंचायत समिती मधील गटशिक्षणाधिकारी लिलाधर बारसागडे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी लिलाधर बारसागडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वत: पुढाकार घेत काही शिक्षकांसह शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्यांचे असे एकूण १ हजार २५० व्यक्तींकडून नेत्रदानाबाबतचा संकल्प फार्म भरून घेतला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प सोडावा यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रफुल्ल काकडे, भारती नंदनवार, अनिल वरघट यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा प्रयत्न करीत आहे.