रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:56 AM2018-08-15T00:56:40+5:302018-08-15T00:57:43+5:30
लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विभागाशी निगडीत अडचणी सोडविण्याकरिता नागपूर येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील विविध समस्यांवर खासदार नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास तडस यांनी चर्चा घडवून आणली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विभागाशी निगडीत अडचणी सोडविण्याकरिता नागपूर येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील विविध समस्यांवर खासदार नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास तडस यांनी चर्चा घडवून आणली. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. शर्मा, बैतुल येथील खासदार ज्योती धुर्वे, अमरावतीचे खासदार आनंदराव अडसुड, राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे, व वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थितीत होते.
वर्धा रेल्वे स्थानकाला विकसीत करण्याकरिता चर्चा करण्यात आली. पुलगांव, धामणगांव, वरुड, मोर्शी, चांदूर, सेवाग्राम, सिंदी, तुळजापूर या स्थानकावर प्रवाशी सुविधांमध्ये वाढ करणे, सेवाग्राम रेल्वे स्थानकापासून इतवाराकडे येणाऱ्या हद्दीतील रस्त्याची सुधारणा करणे, वर्धा देवळी कारंजा आष्टी आर्वी समुद्रपूर येथे डाकघरामध्ये आरक्षण केंद्र निर्माण करणे, पोरबंदर हावडा एक्सप्रेसला वर्धा येथे थांबा देणे, आंध्रप्रदेश एक्सप्रेसला सेवाग्राम येथे थांबा, हावडा कुर्ला ज्ञानेश्वरी एक्सप्रेसला वर्धा येथे थांबा. तुळजापूर व सिंदी रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेसचा थांबा, तुळजापूर रेल्वेस्थानकावर पादचारी पुलाची निर्मिती करणे, बल्लारशाह दरम्यान नविन इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा प्रारंभ करणे, सिकंदराबाद- नागपूर या एक्सप्रेस, चेन्नई जोधपूर व सिंकदराबाद- अजमेर या गाडींला हिंगणघाट येथे थांबा देणे, गरीबरथ एक्सप्रेसला धामणगांव येथे तर काजीपेठ- पुणे एक्सप्रेसला चांदूर येथे थांबा आदी मागण्याबाबत खा. तडस यांनी आग्रही भूमिका घेतली. चांदूर रेल्वे येथील शौचालयाची समस्या, हमसफर एक्सप्रेसला सेवाग्राम व हिंगणघाट येथे थांबा मिळणे, वर्धा-यवतमाळ-नांदेड या नविन रेल्वे लाईनच्या कामाला गती देण्यासोबतच पुलगांव -आर्वी शंकुतला रेल्वेचा प्रस्ताव, आर्वी-वरुड नविन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण, वर्धा रेल्वे स्थानकावरील मालधक्काच्या वेळापत्रकात बदल करणे, सफाई कामगाराच्या समस्या सोडविणे, अमरावती जिल्हयातील खेड रेल्वे स्थानकावर यासह विविध ३८ मुद्दयावर खासदार रामदास तडस यांनी बैठकीमध्ये चर्चा घडवून आणली.
रेल्वे विभागाच्यावतीने वर्धा, सेवाग्राम, धामणगांव, पुलगांव, हिंगणघाट, या रेल्वे स्थानकावर शेडचा विस्तार करणे, वर्धा रेल्वे स्थानकावर आधुनिक एलईडी एंडीकेशन बोर्ड लावणे, वर्धा रेल्वेस्थानकावर अतिरीक्त पादचारी पुलाचे बांधकाम करणे यासह पुलगांव,धामणगांव प्लॅटफार्मचा सुधार करणे, सेवग्राम रेल्वेस्थानकाचा विस्तार करुन पायाभुत सुविधाचा विकास सोबत अतिरीक्त पादचारी पुलाचे बांधकाम करणे,यासोबतच प्रवाश्यांच्या सुविधाकरिता सीसीटीव्ही प्रणाली विकसीत करणे आदी महत्वपुर्ण कामाचा समावेश करण्यात आलेला आहे. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अन्य खासदारांनी समस्या मांडल्या.