अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर आग विझविण्याची जबाबदारी
By admin | Published: April 23, 2017 02:03 AM2017-04-23T02:03:27+5:302017-04-23T02:03:27+5:30
वर्धा-यवतमाळ मार्गावर शुक्रवारी आग लागली. यावेळी देवळी व पुलगाव पालिकेची अग्निशमन यंत्रणा येथे
पालिकांतील अग्निशमन यंत्रणा कुचकामी : पुलगाव, देवळी, सिंदी येथील गाड्या शोभेच्या
वर्धा : वर्धा-यवतमाळ मार्गावर शुक्रवारी आग लागली. यावेळी देवळी व पुलगाव पालिकेची अग्निशमन यंत्रणा येथे येण्याकरिता कुचकामी ठरल्याचे समोर आले. या अनुषंगाने ‘लोकमत’ने जिल्ह्यातील अग्निशमन विभागाचा आढावा घेतला असता धक्कादायक बाबी पुढे आल्या. सहा पालिकांच्या दहा बंबपैकी आठ कार्यरत असले तरी त्यांच्याकडे तज्ज्ञ कर्मचारीच नाही, तर देवळी, पुलगाव आणि सिंदी(रेल्वे) येथील बंब शोभेचे ठरले आहे.
जिल्ह्यात एकूण सहा पालिका आहे. त्यांना शासनाच्यावतीने अग्निशमन यंत्रणा दिली; मात्र त्याच्या वापराकरिता आवश्यक तंत्रज्ज्ञ नाही. सहाही पालिकेत आठ वाहने आहेत. वर्धा, हिंगणघाट आणि आर्वी येथील वाहने आग विझविण्याकरिता धावत असले तरी पुलगाव, देवळी आणि सिंदी (रेल्वे) येथील वाहने कर्मचाऱ्यांअभावी जागीच उभी आहेत. यामुळे या गावात आग लागल्यास दुसऱ्यांवरच अवलंबून रहावे लागते. शहरातील अग्निशमन यंत्रणा अपडेट करण्याकरिता कर्मचाऱ्यांचा भरणा करण्याची मागणी आहे; मात्र जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात कुठलीही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते.
वर्धेव्यतिरिक्त १०१ नावालाच
आग लागल्यास त्याची माहिती अग्निशमन दलाला देण्याकरिता शासनाच्यावतीने १०१ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास यंत्रणा घटनास्थळी दाखल होते.
ही सेवा सहा पालिकांपैकी केवळ वर्धा पालिकेतच असल्याचे समोर आले आहे. मध्यंतरी येथेही नागरिकांकडून गरज नसताना फोन आल्याने जोपर्यंत पोलिसांकडून फोन येत नाही, तोपर्यंत वाहन पाठविण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात झाला.
हिंगणघाट पालिकेत तर शासनाचा १०१ हा क्रमांक मिळविण्याकरिता शासनाकडे गत तीन वर्षांपासून मागणी करण्यात आली असून त्या संदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे समोर आले आहे. अशीच अवस्था आर्वीत आहे. येथे हा क्रमांकच नसल्याचे समोर आले आहे. तर सिंदी, देवळी आणि पुलगाव येथे तर अग्नीशमन यंत्रणा वापरात नसल्याने हा क्रमांक येथे नसल्याचेचे समोर आले आहे.